हातगाडे रस्त्यावर; दंड मात्र खरेदीदारास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:25+5:302020-12-14T04:31:25+5:30
शहरातील जिंतूर रोड भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. हा भाग राष्ट्रीय महामार्गाचा असून, या रस्त्याच्या कडेला जांब नाका ते ...
शहरातील जिंतूर रोड भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. हा भाग राष्ट्रीय महामार्गाचा असून, या रस्त्याच्या कडेला जांब नाका ते महाराणा प्रताप चौकापर्यंत अनेक फळ विक्रेते आणि हातगाडेचालकांनी व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ग्राहक रस्त्याच्या कडेला उभे राहून याठिकाणी खरेदी करतात. वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी जिंतूर रोड भागात फळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मात्र वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणावरून दंड ठोठावला. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाडेचालक आणि विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अतिक्रमणाचा पादचारी, वाहनचालकांना त्रास
जांब नाका परिसरात अनेक फळ विक्रेते, हॉटेलचालक, छोट्या-मोठ्या दुकानदारांनी कच्चे व पक्के अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या परिसरात दररोज छोटे-मोठे अपघात घडत असल्याने या भागातील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.