अनंता टोम्पेंच्या खुन्यांना फाशी द्या; मूकमोर्चातून पाथरीकरांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:19 IST2025-04-21T17:19:05+5:302025-04-21T17:19:48+5:30
अनंता हरिभाऊ टोम्पे यांचा पैशांच्या वादातून अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता.

अनंता टोम्पेंच्या खुन्यांना फाशी द्या; मूकमोर्चातून पाथरीकरांची मागणी
पाथरी (पाथरी): पैशाच्या देवाणघेवानाच्या व्यवहारातून अमानुष मारहाण करून अनंता टोम्पे यांची हत्या करण्यात आली त्याना न्याय मिळावा, गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी, कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे आणि पुन्हा कुणाचंही घर असं उजाडू नये, अशी मागणी करत सोमवारी (२१ एप्रिल) पाथरी येथे मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला-पुरुष, विद्यार्थी सहभागी झाले होते.
अनंता हरिभाऊ टोम्पे यांचा पैशांच्या वादातून अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह नगरपरिषदेच्या बाबा टॉवरजवळील सार्वजनिक शौचालय परिसरात आढळून आला. ही घटना संपूर्ण पाथरी शहराला हादरवून गेली आहे. चालक असलेले टोम्पे अत्यंत साधारण घरातील होते. त्यांच्या हत्येने टोम्पे यांची पत्नी आणि पाच मुली रस्त्यावर आल्या आहेत. त्यांच्या मदतीसाठी पाथरीकरांनी आर्थिक मदत दिली होती. त्यानंतर न्यायाची मागणी करत पाथरीकर सरसावले आहेत.
आज मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता राम मंदिर परिसरातून झाली.“आरोपीस कठोर शिक्षा द्या”, “अनंता टोम्पेंना न्याय मिळावा”, “आमचं घर असं उजाडू नये” असे फलक घेऊन आंदोलक मोर्चात सहभागी झाले. मुख्य रस्त्याने चालत चालत मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला, जिथे प्रशासनाला निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली. “गुन्हेगारास फक्त शिक्षा नाही, तर कठोरात कठोर शिक्षा व्हावी. जेणेकरून समाजात भय निर्माण होईल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. तसेच टोम्पे कुटुंबाचे पुनर्वसन करावे,” अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली.