रस्त्याच्या दुरवस्थेने वाहनचालक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:13+5:302021-03-16T04:18:13+5:30
मजुरांअभावी शेतकरी हैराण परभणी: रब्बी हंगामातील ज्वारी पीक सध्या काढणीस आले आहे. मात्र हे पीक काढणीस मजूर मिळत नाहीत. ...
मजुरांअभावी शेतकरी हैराण
परभणी: रब्बी हंगामातील ज्वारी पीक सध्या काढणीस आले आहे. मात्र हे पीक काढणीस मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मजुरांसाठी भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी तर मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसमवेत ज्वारी काढण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.
प्रवाशांची हेळसांड सुरुच
परभणी:येथील बसस्थानकाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे तात्पुरते शेड उभारुन परभणी आगाराकडून बससेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागातील प्रवाशांना बसची वाट पाहत थांबण्यासाठी पुरेशी सुविधा एस.टी.महामंडळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची हेळसांड सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज
परभणी-येथील वनविभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत या वृक्षांना पाणी मिळत नसल्याने जागेवरच करपून जात आहेत. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीला मोठा गाजावाजा करुन शासनस्तरावरुन वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते; मात्र कालांतराने हे रोपटे जागेवरच करपून जात आहेत.त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी शाश्वत पाणीपुरवठा निर्माण करण्याची गरज आहे.
विहिरींची कामे संथगतीने
परभणी: सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे संथगतीने सुरु आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ज्या उद्देशाने ही योजना राबविली. त्या उद्देशाला प्रशासनाकडून मात्र हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आगामी उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंतीच करावी लागत आहे.
बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ
गंगाखेड: तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव दाखल करुनही बँका या न त्या कारणाने कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जोडरस्त्यांची दयनीय अवस्था
सेलू :तालुक्यातील मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या जोडरस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याचा दैनंदिन दळणवळणावर परिणाम झाला आहे.सेलू ते शिंदे टाकळी रस्त्यावरील गोहेगाव पाटी ते गोहेगाव या ३ किलोमीटर रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. हा रस्ता पूर्णत: उखडला आहे. सेलू-आष्टी मार्गावरील लाडनांद्रा पाटी ते लाडनांद्रा या २ किलोमीटर अंतराच्या जोडरस्त्याचीही दयनीय स्थिती झाली आहे.
सेलू- वालूर रस्त्यावर वाढले खड्डे
सेलू : सेलू ते वालूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच हा रस्ता करण्यात आला होता. मात्र वाळूच्या वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.
दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा
सेलू : तालुक्यात वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दुधना नदीपात्रातून दिवस-रात्र अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. ट्रॅक्टरमधून सर्रास या वाळूची वाहतूक केली जात असून, यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
घरकुलाचे ४२ लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत
मानवत: समाजातील सर्व घटकांना हक्काचे घर मिळावे, या प्रमुख उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी घरकूल योजना राबविण्यात येते. रमाई घरकूल योजनेंतर्गत एक महिन्यापूर्वी ४२ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली असून हे लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.