वीज प्रवाह गुल झाल्याने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:15+5:302021-04-29T04:13:15+5:30
परभणी : मंगळवारी रात्री वादळी वाऱ्याने शहरातील वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली. परभणी शहरासह परिसरात ...
परभणी : मंगळवारी रात्री वादळी वाऱ्याने शहरातील वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली.
परभणी शहरासह परिसरात २७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचे वारे सुटले होते. या वादळी वाऱ्यांमुळे शहरातील वीजप्रवाह खंडित झाला. रात्री साडेदहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा रात्री एक वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, तापमानात मोठी वाढ झाली आहे. कुलर आणि पंखे विजेअभावी बंद राहिल्यामुळे रात्रभर नागरिकांची घालमेल झाली.
विशेष म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांच्या वादळी वाऱ्यामुळे तब्बल तीन ते चार तास वीजप्रवाह खंडित राहिला. अनेक नागरिकांनी महावितरणच्या कॉल सेंटरला फोन करून वीजप्रवाह कधी सुरू होणार, याची माहिती घेतली. परंतु, महावितरणकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. रात्री थोडा जरी पाऊस झाला तरीही वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.