वाळू माफियांचे कंबरडे मोडले; एकाच कारवाईत तब्बल ९८ आरोपी, नऊ कोटींचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:46 AM2022-05-13T11:46:55+5:302022-05-13T11:48:01+5:30
sand mafia: पूर्णा तालुक्यातील वझुर येथे पोलिसांनी मोठी कारवाई केली
परभणी : पूर्णा तालुक्यातील वझुर येथील वाळू धक्क्यावरून अवैध वाळू उपसा केला जात असताना १२ मे रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तब्बल ९८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी ४५ वाहने जप्त केली आहेत. एकूण ७ कोटी ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळू घाटांचे लिलाव झाले असले तरी नियमांचे उल्लंघन करीत हा वाळू उपसा होत असल्याने पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे. १२ मे रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील वझुर येथे जेसीबी, बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रेनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माने, पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत ९८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वाळू उपसा करण्यासाठी वापरलेली ४५ वाहने जप्त केली आहेत. एकूण ७ कोटी ३९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वझुर परिसरात केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
तक्रारीत पोलिसांनी काय म्हटले?
- पूर्णा तालुक्यातील वझुर येथील वाळू घाटात रात्रीच्यावेळी वाळूचे उत्खनन करण्यासाठी कोणताही परवाना नसताना जाणीवपूर्वक नदीपात्रात उतरून वाळू उत्खनन केले.
- नदीपात्रात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पाण्यामध्ये दगड-गोटे मुरूम वेड्या बाभळी टाकून पात्रात बंधारा बांधला. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाला.
- मुरूम व वेड्या बाभळीच्या काट्या व लाकडाने नदी पात्रातील पाणी दूषित करण्यात आले. पिण्यायोग्य असलेले पाणी दूषित करणे, त्याचप्रमाणे पाण्याच्या प्रवाहात बदल करून प्रमाणाबाहेर वाळूचे उत्खनन करण्यात आले. या उत्खननाने शेती व पिण्याच्या पाण्यामध्ये घट होईल याची जाणीव असतानाही अशी कृती करणे.
- नदीच्या निचरा प्रक्रियेस क्षती पोहचविणे, या कारणांवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.