उसने दिलेले ३०० रुपये मागितले; त्यांनी युवकावर कोयत्याने ३१ वार केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 01:16 PM2020-03-19T13:16:17+5:302020-03-19T13:22:03+5:30
नाशिकवरून आलेल्या ४ जणांनी केली हत्या; आरोपी पोलीस स्थानकात हजर
सेलू ( परभणी ) : हात उसने दिलेल्या पैशाच्या देवाण- घेवाणीवरून चार जणांनी मिळून भावकीतीलच एका युवकांचा कोयता आणि चाकूचे वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील कुंडी येथे बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. चार पैकी तीन आरोपी शस्ञासह कारने स्वत:हून रात्री साडे दहा वाजता पोलिस ठाण्यात हजर झाले. मयताचे नाव राहूल देवीदास डंबाळे (३५) असे आहे.
मयताची आई प्रयागबाई डंबाळे यांनी सेलू पोलिसात फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा राहूल देविदास डंबाळे याने भावकीतीलच एकनाथ डंबाळे यांना ६०० रूपये उसने दिले होते. मंगळवारी रोजी सकाळी दहा वाजता दवाखान्यात जायचे काम पडल्याने राहूलने एकनाथ डंबाळे यांना पैसे मागितले.त्यांनी ३०० रूपये दिले.उर्वरित तीनशे रूपयावरून राहूल आणि एकनाथ डंबाळे यांच्यात शिवीगाळ होऊन भांडण झाले होते.
दरम्यान, बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एकनाथ डंबाळे यांचे नाशिक येथे राहणारे संतोष, कपील, प्रकाश हे तीन मुले व त्यांचा साथीदार मिलिंद देवीदास कांबळे रा मानोली ता मानवत हे चौघे जण कारने गावात दाखल झाले. राहूल घरासमोर उभा असतांना चौघांनी कोयता आणि चाकूने मानावर, हातावर सपासप वार केल्याने राहूल रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यांचा जागीच मुत्यू झाला.
चोघांनी तब्बल ३१ वार केले
राहूल याच्या अंगावर तब्बल ३१ वार आहेत. खून करून आरोपी संतोष, कपील, मिलिंद कांबळे हे कार घेऊन क्रमांक ( एम एच १५ एफ टी- ४२४०) सेलू पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री साडे दहा वाजता शस्ञासह हजर झाले. त्यांनी गुन्हाची कबुली दिली. तर प्रकाश एकनाथ डंबाळे यास कुंडी येथून पोलीसांनी अटक केली.घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलिस निरिक्षक वसूंधरा बोरगावकर यांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.
राहूलकडून नेहमीच होता ञास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राहूल हा भावकीतील लोकांना नेहमीच ञास देत होता. तसेच त्यांची वर्तणूक चांगली नव्हती. महिलांवर वाईट नजर असल्याच्या त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. यातूनच त्यांचा खुन झाला असावा असे प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी सांगितले.