स्वस्तात कार देण्याचे आमिष दाखवून २५ हजारांना फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:15+5:302021-06-22T04:13:15+5:30
परभणी शहरातील विद्यानगर भागातील संकेत चारुदत्त पानसे यांना २५ मे रोजी त्यांच्या फेसबुकवर मारुती सुझुकी वॅगणार ही कार स्वस्तात ...
परभणी शहरातील विद्यानगर भागातील संकेत चारुदत्त पानसे यांना २५ मे रोजी त्यांच्या फेसबुकवर मारुती सुझुकी वॅगणार ही कार स्वस्तात विकत असल्याची एक पोस्ट दिसली. त्यामुळे त्यांनी या पोस्टवर नाव असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने ८३४२०९५४११ मोबाइल नंबर संपर्क साधण्यासाठी दिला. पानसे यांनी या मोबाइलवर संपर्क साधला असता त्याने त्याचे नाव अमरीश मयेकर, राहणार पनवेल असे सांगून सध्या मी नाशिक देवळाली कॅम्प येथे आर्मीमध्ये आहे, असे सांगितले. तेव्हा पानसे यांनी सदरची कार पाहण्यासाठी कोठे व केव्हा येऊ, असे विचारले असता त्याने त्यांना मी देवळाली कॅम्पमध्ये आहे. तुम्हाला कॅम्पमध्ये भेटू देणार नाही. मी स्वतः कार घेऊन तुमच्या पत्त्यावर येतो. मला तुमचा पत्ता सांगा, असे सांगितल्यानंतर त्यांनी त्यास पत्ता दिला. त्यानंतर टोकन रक्कम म्हणून त्याने ५ हजार रुपये ७२३१०८०९८५ या क्रमांकावर फोन पेद्वारे पाठवण्यास सांगितले. त्यामुळे पानसे यांनी सदरील रक्कम पाठवली. त्यानंतर समोरील व्यक्तीने पैसे का पाठवले नाहीत, म्हणून पानसे यांना तुमचे पैसे बुडवणार नव्हतो, असे सांगतिले. पानसे यांनी पैसे पाठवल्याचे सांगितले. त्यावेळी पैसे मिळाले नाहीत, म्हणून त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याचे आर्मीचे ओळख पत्र व कारचे आरसी बुकची झेरॉक्स फोटो व त्याचा नाशिक येथील सहकारी मित्र मनिष खेमका याचेही ओळखपत्र व्हाॅटस्ॲपवर पाठवले. पानसे यांचा विश्वास बसल्याने नंतर समोरील व्यक्तीने मागणी केल्याप्रमाणे त्यांनी इन्शुरन्स, कारला ट्रॅकर बसवला आदी कारण सांगून त्यांच्याकडून एकूण २४ हजार ९९९ रुपये फोन पेद्वारे घेतले. तसेच दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत कार तुमच्या घरी येईल, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी कार घरी आली नाही. त्यामुळे त्यांनी सदरील दोन्ही मोबाइल नंबरवर फोन केला असता, दोन्ही नंबर बंद आढळले. याबाबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १७ जून रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमरीश मयेकर याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.