कामाचे उर्वरित पैसे परत मागितल्याने लेखनिकाने फोडले शेतकर्याचे डोके; गंगाखेड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 06:17 PM2017-12-29T18:17:25+5:302017-12-29T18:19:09+5:30
पीक विम्याचे अर्ज भरून देणार्या एका खाजगी लेखनिकाने अर्ज भरलेल्या कामातून उर्वरित रक्कम शेतकर्याने परत मागितल्याच्या कारणावरून त्याचे दगड मारून डोके फोडले.
गंगाखेड : पीक विम्याचे अर्ज भरून देणार्या एका खाजगी लेखनिकाने अर्ज भरलेल्या कामातून उर्वरित रक्कम शेतकर्याने परत मागितल्याच्या कारणावरून त्याचे दगड मारून डोके फोडले. गुरुवारी (दि.२८) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड शहरातील वकील कॉलनीत ही घटना घडली़
रबी हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने शेतकरी बांधवांची मोठी गर्दी होत आहे़ तलाठी कार्यालय, बँक परिसर आणि महा-ई-सेवा केंद्राच्या बाहेर ही गर्दी होत असून, गर्दीचा फायदा घेत अनेक सुशिक्षीत बेरोजगारांसह काही युवकांनी किचकट असलेला पीक विमा अर्ज भरून देण्याचे काम सुरू केले आहे़ खाजगी लेखनिक म्हणून हे युवक भूमिका बजावत आहेत़ पीक विम्याचा एक अर्ज भरून दिल्यानंतर शेतकर्यांकडून २० रुपये घेतले जात आहेत़
२८ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मैराळ सावंगी येथील सिद्धार्थ चोखोबा सावंत (३२) यांनी वकील कॉलनी परिसरातील मारोती मंदिराच्या पाठीमागे तलाठी कार्यालयाबाहेर टेबल टाकून पीक विमा अर्ज भरून देणार्या संतोष मारोती चव्हाण (रा़ शिवाजी नगर, गंगाखेड) यांच्याकडे ५० रुपयांमध्ये सात अर्ज भरून घेतले व ५०० रुपयांची नोट देऊन ४५० रुपये परत मागितले़
याच वेळी कशाचे पैसे द्यायचे असे म्हणत संतोष चव्हाण याने शिवीगाळ करून मारहाण केली व त्या ठिकाणी असलेला एक दगड उचलून सावंत यांच्या डोक्यात मारला़ यात त्यांचे डोके फुटले आहे़ सिद्धार्थ सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, जमादार रंगनाथ देवकर, माणिक वाघ तपास करीत आहेत़