जिंतूरजवळ भीषण अपघात; अकोली पुलावर भरधाव ट्रकने तिघां भावांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 01:00 PM2022-01-24T13:00:30+5:302022-01-24T13:01:15+5:30
दोन सख्ख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू
जिंतूर ( परभणी ) : स्वतःच्या दुकानावर जात असताना अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलवरील तिघा भावांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील अकोली पुलावर घडली. अभिषेक काशीनाथ म्हेत्रे (१८ ), योगेश काशिनाथ म्हेत्रे ( १५ ), रामप्रसाद विश्वनाथ मेहेत्रे ( २० ) अशी मृतांची नावे आहेत. मृतातील दोघे सख्खे तर एक चुलत भाऊ होता. जिंतूरपासून चार किलोमीटर अंतरावरील अकोली गावाच्या पुलाजवळ असणारा खड्डा चुकवताना हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
मालेगाव येथील अभिषेक, योगेश आणि रामप्रसाद हे तिघे भाऊ आज सकाळी जिंतूरमधील भाजीमंडीमध्ये असणाऱ्या स्वतःच्या किराणा दुकानावर दुचाकीवरून (एम एस 26- 2834 ) जात होते. जिंतूरपासून अवघ्या ४ किलोमीटरवर असलेल्या अकोलीजवळील उड्डाण पुलावर समोरून येणाऱ्या ट्रकने ( एम एच18 -बि जि 6270) दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकखाली आल्याने तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात ऐवढा भीषण होता की, त्याठिकाणी हाडामासाचा सडा पडला होता.
अपघातानंतर अकोली गावातील ग्रामस्थांनी या संदर्भातली माहिती जिंतूर पोलिसांना दिली. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक दीपक शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी भेट देऊन देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ आकात, पांडुरंग मुसळे ,तुकाराम शेटे, ज्ञानेश्वर पांचाळ, रुग्णवाहिका चालक घुगे यांनी मृतदेह रुग्णालयात आणण्यासाठी मदत केली.
खड्डा चुकवताना झाला अपघात?
अकोली पुलाजवळ मोठा खड्डा आहे. हा खड्डा चुकवताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघे खाली पडले आणि याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या मार्गावर खड्डे आणि गरोधक यांमुळे आतापर्यंत ८ जणांचा बळी गेले आहेत. यामुळे या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार हेच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.