परभणी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:36 AM2020-06-12T11:36:40+5:302020-06-12T11:37:12+5:30
पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून पेरण्याची तयारीला वेग आला आहे.
परभणी : मान्सूनच्या पावसाने बुधवारी रात्री दमदार हजेरी लावल्यानंतर गुरुवारी रात्रीही अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून पेरण्याची तयारीला वेग आला आहे.
जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे चित्र बुधवारी झालेल्या पावसामुळे निर्माण झाले आहे. मान्सूनचा पहिला पाऊस जोरदार बसल्याने बळीराजा सुखावला आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्रीही पावसाने हजेरी लावली. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक २५.६३ मिमी, परभणी ३.५, पालम १४.६७, पूर्णा ७.६०, गंगाखेड ७.२५, सोनपठ ५ आणि मानवत तालुक्यामध्ये १.६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यात ७८.३१ मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या ८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.