परभणी जिल्हाभरात जोरदार पाऊस; ढालेगाव, खडका बंधारे भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:38 PM2018-08-17T23:38:34+5:302018-08-17T23:39:11+5:30

तब्बल २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग ३० तास झालेल्या संततधार पावसामुळे पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा ७५ टक्के तर सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा १०० टक्के भरला असून पूर्णा, दुधना, थुना या नद्या चालू वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहत असल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले. वरुण राजाच्या या कृपेमुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे.

Heavy rains in Parbhani district; Dhalegaon, Khadka bunds filled | परभणी जिल्हाभरात जोरदार पाऊस; ढालेगाव, खडका बंधारे भरले

परभणी जिल्हाभरात जोरदार पाऊस; ढालेगाव, खडका बंधारे भरले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तब्बल २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग ३० तास झालेल्या संततधार पावसामुळे पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा ७५ टक्के तर सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा १०० टक्के भरला असून पूर्णा, दुधना, थुना या नद्या चालू वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरुन वाहत असल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले. वरुण राजाच्या या कृपेमुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे.
परभणी जिल्ह्यात गेले २५ दिवस पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील ५ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. त्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले होते. वरुण राजानेही बळीराजाची निराशा न करता १५ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेपासून बरसण्यास सुरुवात केली. सलग ३० तास संततधार भीज पाऊस झाल्याने सर्व शिवारात पाणीच पाणी दिसून आले. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, झरी, कुंभारी बाजार, पिंगळी, ब्राह्मणगाव, मांडाखळी, खानापूर, असोला आदी गाव शिवारामध्ये जोरदार पाऊस झाला.
मानवत तालुक्यात १५ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास सुरु झालेल्या पावसाने १७ आॅगस्ट रोजी सकाळी विश्रांती घेतली. या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. किन्होळा गावातून गेलेल्या कॅनॉलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले. येथील शेतकरी सर्जेराव कदम यांचा सालगडी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कॅनॉलच्या कडेने बैलगाडी घेऊन शेताकडे जात असताना घसरुन बैलजोडीसह बैलगाडी कॅनॉलमध्ये पडली. कॅनॉलमधील पाण्याचा वेग अधिक असल्याने बैल पाण्यात वाहून गेले. काही अंतरावर ट्रक्टरच्या सहाय्याने साखळी बांधून बैलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यावेळी दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. या पावसामुळे नागरजवळा येथील बापुराव कसारे, बाबासाहेब होगे, रमेश होगे यांच्या घराच्या भिंती पडून नुकसान झाले. तलाठी सिंगणवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मानवत शहरात शासकीय विश्रागृहासमोरील झाड विद्युत खांबावरील तारावर पडल्याने गुरुवारी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मानवत शहरातही जोरदार पाऊस झाला.
पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा ७५ टक्के भरला आहे. सद्यस्थितीत बंधाऱ्यात ११.३५ दलघमी पाणीसाठा झाला असून आणखीही बंधाºयात पाण्याची आवक सुरुच आहे. तालुक्यातील तारुगव्हाण- पोहनेर रस्त्यावरील पुलाच्या नळकांड्या बंद पडल्याने कानसूर येथील सुदाम व्यंकोबा शिंदे, अच्युत काकडे व महादेव काकडे या शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सोनपेठ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील गोदावरी नदीवरील खडका येथील बंधारा १०० टक्के भरल्याने या बंधाºयाचा एक दरवाजा शुक्रवारी उघडण्यात आला. तालुक्यातील मुद्गल बंधाºयात मात्र २१ टक्केच पाणीसाठा झाला आहे. सोनपेठ शहरात जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाणीच पाणी झाल्याचे पहावयास मिळाले.
पूर्णा तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. औंढा नागनाथ, हिंगोली आदी तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे पूर्णा नदीत पाणी आल्याने पूर्णा व थुना या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत असल्याचे पहावयास मिळाले. पाटबंधारे विभागाने शुक्रवारी दुपारी १२ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पूर्णा नदीपात्रातील पाणी पातळी ४ मीटरने वाढल्याचे स्पष्ट झाले. नदीमध्ये पाण्याची आवक सुरुच आहे. माटेगाव- बरमाळ, पिंपळगड नाला, आहेरवाडी येथील लहान ओढ्यांना पाणी आले होते. आहेरवाडी ते पूर्णा रस्त्यावरील लहान नदीला पाणी आल्याने शुक्रवारी दुपारपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
जिंतूर तालुक्यातही झालेल्या जोरदार पावसामुळे पहिल्यांदाच नदी व ओढ्यांना पाणी आल्याचे पहावयास मिळाले. तालुक्यातील जिंतूर- निवळी रस्त्यावरील पाचलेगाव जवळील पुलावरुन दुपारी २ वाजता पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. जिंतूर शहरातील रस्त्यावरुनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. जिल्हा परिषद प्रशाला, कस्तुरबा गांधी विद्यालयाचे वसतिगृह या सभोवतालचा परिसर जलमय झाल्याचे पहावयास मिळाले. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी २४ महसूल मंडळांत अतिवृष्टी
परभणी- जिल्हाभरात गेल्या २४ तासांत ३९ पैकी २४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून विविध ठिकाणचे नदी, नाले खळखळून वाहू लागले आहेत. परभणी शहरासह जिल्हाभरात १५ आॅगस्ट रोजी रात्री बारा वाजेपासून पावसास सुरूवात झाली. जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाच्या महसूल विभागातील नोंदीनुसार जिल्ह्यातील ३९ पैकी २४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील सिंगणापूूर मंडळात ६८ मि.मी., झरी मंडळात ८८ मि.मी., पेडगाव मंडळात ६९ मि.मी., जांब मंडळात ६६ मि.मी., पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात १०४ मि.मी., ताडकळस मंडळात ६९ मि.मी., चुडावा मंडळात ७९ मि.मी., सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ मंडळात ९४ मि.मी., सेलू तालुक्यातील सेलू मंडळात १३७ मि.मी., देऊळगाव मंडळात ६५ मि.मी., कुपटा मंडळात ८८ मि.मी., वालूर मंडळात ८३ मि.मी., चिकलठाणा मंडळात १०८ मि.मी., पाथरी तालुक्यातील पाथरी मंडळात १४२ मि.मी., बाभळगाव मंडळात ८० मि.मी., हादगाव मंडळात ७९ मि.मी., जिंतूर तालुक्यातील जिंतूर मंडळात १०४ मि.मी., सावंगी म्हाळसा मंडळात ९४ मि.मी. , बोरी मंडळात ७६ मि.मी., चारठाणा मंडळात ८३ मि.मी., तर बामणी मंडळात १२४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मानवत तालुक्यातील मानवत मंडळात १६३ मि.मी., केकरजवळा मंडळात ७९ मि.मी. आणि कोल्हा मंडळात ६८ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ७३.९७ मि.मी. सरासरी पावसाची महसूलकडे नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३८१.२७ मि.मी. पाऊस झाला आहे.

Web Title: Heavy rains in Parbhani district; Dhalegaon, Khadka bunds filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.