अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले; दुरुस्तीसाठी 30 कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:38 PM2020-11-20T17:38:40+5:302020-11-20T17:39:50+5:30

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Heavy rains washed away roads; 30 crore required for repairs | अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले; दुरुस्तीसाठी 30 कोटींची गरज

अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले; दुरुस्तीसाठी 30 कोटींची गरज

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाने नोंदविली मागणी, प्रवाशांची  तारांबळअतिवृष्टीने पिकांबरोबरच जिल्ह्यात रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात हानी

परभणी : जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची हानी झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी ३८ लाख रुपयांची आवश्यकता भासणार असून तशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे नोंदविली आहे.

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीने पिकांबरोबरच जिल्ह्यात रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली. काही पूल वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे सततच्या पावसामुळे  जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. जून ते ऑक्टोबर या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील ७२५.८४ कि.मी. लांबीच्या ऱस्त्यांवर खड्डे पडले असून ते खड्डे बुजविण्यासाठी १४ कोटी ५२ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ३.०७ कि.मी. लांबीचे रस्ते वाहून गेले आहेत. 
पुलाच्या ६६ मोऱ्या वाहून गेल्या असून, ५.३० कि.मी.चे डोंगरी भागातील रस्ते वाहून गेले आहेत.  ४८.६८  कि.मी.चे रस्ते क्षतीग्रस्त झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी १४ कोटी ५२ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. २०१९ ते २०२१ या दोन वर्षात पर्जन्यमानामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. 
हे खड्डे बुजविण्यासाठी १५ कोटी ८६ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसेच २०१९ ते २०२१ या काळात मंजूर झालेले रस्ते आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांसाठी निधी लागणार आहे. एकंदर जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी ३८ लाख रुपयांची आवश्यकता असून हा निधी जिल्ह्याला उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी सार्वजनिक  बांधकाम विभागाने शासनाकडे नोंदविली आहे. 
केंद्राकडेही ७ कोटीची मागणी
जिल्ह्यातील काही रस्ते केंद्र शासनाच्या अख्त्यारित आहेत. त्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत जिल्ह्यातील १४३.७४५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी १ कोटी ४४ लाख रुपये.n प्रमुख जिल्हा मार्गावरील पूरहानीग्रस्त झालेल्या ५८२ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ८२ लाख असा एकूण ७ कोटी २६ लाख रुपयांचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी आवश्यक असल्याचे बांधकाम  विभागाने नमूद केले आहे.

७०० कि.मी.च्या रस्त्यावर खड्डे 
प्रमुख राज्यमार्ग, राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग अशा एकूण तीनही विभागातील रस्त्यांची लांबी १६३९ कि.मी. एवढी आहे. त्यामध्ये ११२.४१ कि.मी.चे प्रमुख राज्य मार्ग जिल्ह्यातून जातात. ५०८.६५ कि.मी.चे राज्य मार्ग आणि प्रमुख जिल्हामार्गाची लांबी १०१७.९७  कि.मी.  एवढी आहे. या एकूण लांबीच्या रस्त्यांपैकी अतिवृष्टीमुळे तब्बल ७२५.८४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण रस्त्यांपैकी ४४ टक्के रस्ते खड्डेमय असल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे.
 

Web Title: Heavy rains washed away roads; 30 crore required for repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.