प्रशासनाच्या मदतीने पुरातन वारस्याला नवी झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:34+5:302021-01-01T04:12:34+5:30
पुरातन चिरेबंदी आणि बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कलेचा नमुना ठरलेली अनेक पौराणिक मंदिरे जिल्ह्यात जिर्णावस्थेत उभी आहेत. जिल्ह्याच्या वैभवाची यादी ...
पुरातन चिरेबंदी आणि बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कलेचा नमुना ठरलेली अनेक पौराणिक मंदिरे जिल्ह्यात जिर्णावस्थेत उभी आहेत. जिल्ह्याच्या वैभवाची यादी करताना मंदिरांच्या नावाचा तर समावेश होतो. मात्र ही मंदिरे जतन करण्यासाठी आणि त्यांचे आयुष्य वाढविण्यासाठी फारसे प्रयत्न होत नव्हते. देवगिरी सांस्कृतिक मंचने हे काम हाती घेतले आहे. पुरातन मंदिरे असलेल्या गावांमध्ये नागरिकांना एकत्र करुन मंदिरांचे वैशिष्ट्य त्यांना सांगणे, प्रत्येक आठवड्यात मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविणे अशी कामे सध्या हाती घेतली जात आहेत. अकराव्या ते तेराव्या शतकात उत्तर चालूक्य कालीन मंदिरे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. त्यात परभणी तालुक्यातील धारासूर येथील गुप्तेश्वर, जांब येथील विष्णूचे मंदिरांचा समावेश आहे. तर १३ व्या शतकातील हेमाडपंथी शैलीची मंदिरेही ठिकठिकाणी आहेत. जिंतूर तालुक्यातील चारठाणा हे गाव तर पौराणिक मंदिरांनी नटलेले आहे. या मंदिरांच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचे फलक तर पहावयास मिळतात. मात्र या मंदिरांच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. ही पुरातन मंदिरे ढासळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यातच काही मंदिरांतील शिल्पांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मंदिरांच्या पुनरुज्जीवनासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच पुरातत्व विभागास निधी वर्ग करण्याचे सकारात्मक प्रयत्न होत आहेत.
समिती करणार सर्वेक्षण
जिल्ह्यातील पुरातन मंदिरांचा इतिहास नवीन पिढीसमोर मांडण्यासाठी एका समितीची स्थापना झाली आहे. या समितीतील अभ्यासक मंडळी या पुरातन वारस्याचे सर्वेक्षण करुन या मंदिरांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर यावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. या मंदिरांच्या पुनरुज्जीवनासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनीही पुढाकार घेतला असून, निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
या गावांत आहेत पुरातन मंदिरे
चारठाणा, बोरी, नेमिगरी, भोगाव, मानकेश्वर (ता.जिंतूर), धारासूर, जांब, पिंगळी, आर्वी, पिंपरी देशमुख (ता.परभणी), गंगाखेड, राणीसावरगाव (ता.गंगाखेड), वालूर, हतनूर (ता.सेलू), पाथरी, मुदगल (ता.पाथरी).