'येथे गाव विकणे आहे'; रस्त्यासाठी ग्रामस्थांनी गावच काढले विक्रीला, रविवारी लागणार बोली

By मारोती जुंबडे | Published: September 23, 2022 06:02 PM2022-09-23T18:02:45+5:302022-09-23T18:03:13+5:30

रस्ता तयार करुन देण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप

'Here is the village to sell'; Villagers have put the village up for sale for the road, bidding will be held on Sunday | 'येथे गाव विकणे आहे'; रस्त्यासाठी ग्रामस्थांनी गावच काढले विक्रीला, रविवारी लागणार बोली

'येथे गाव विकणे आहे'; रस्त्यासाठी ग्रामस्थांनी गावच काढले विक्रीला, रविवारी लागणार बोली

googlenewsNext

परभणी: पूर्णा तालुक्यातील माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा तीन किमी रस्ता तयार करून देण्यासाठी ग्रामस्थांकडून उपोषण करण्यात आले. या उपोषणास जिल्हाधिकारी व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यास अपयशी ठरल्याचा आरोप करीत माहेर ग्रामस्थांनी चक्क बोलीद्वारे गावच विक्री काढल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला आहे.

पूर्णा तालुक्यातील माहेर हे ५०० लोकसंख्या असलेले छोटे गाव आहे. हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि. मी. अंतरावर आहे. मात्र या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका व जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. १६ वर्षापूर्वी म्हणजेच २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याचे पूर्णा तालुक्यातील माहेर पाटीपासून ते गावापर्यंतचा ३ कि. मी. पर्यंतचा रस्ता तयार करण्यात यावा, या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांना जिल्हाधिकारी व गावास भेट देण्यास आलेले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले. त्यानंतर या रस्त्यावर कच्चे खडक टाकण्यात आले. मात्र, रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

सध्यस्थितीत बानेगाव थांबा ते माहेर ३ किमी रस्त्यावर ८ महिने २-३ फूट चिखल राहतो. या चिखलातून ग्रामस्थांना तालुका,जिल्हाचे ठिकाणी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच गरोदर मातांना,रुग्णांना, वृध्दांना रूग्णालयात नेणे अवघड झाले आहे. मागील वर्षी शालेय पोषण आहाराचा ट्रक रस्त्याअभावी वापस गेल्याने सर्व तालुक्यासह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा फौज फाटाने गाव गाठले. विशेष म्हणजे तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना आपल्या गाड्या सोडून पायीच गाव गाठावे लागले होते. त्यावेळी लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या घटनेला एका वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन ही अद्याप गावकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी २५ सप्टेंबर पर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर गाव,घर,शेतीबाडीसह बोलीव्दारे विक्री काढणार आहोत. अशा अशयाचे निवेदन २२ सप्टेंबर रोजी तहसीलदार पल्लवी टेमकर यांना देण्यात आले आहे.

आतापर्यंत ३ वेळा उपोषण
भारत स्वतंत्र होऊन ७५वर्ष झाले तरी अद्याप गावाला रस्ता नसल्याने ही बाब निवेदने,आंदोलने तसेच उपोषण करून जिल्हा प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. यासाठी ३१ जून २०२१,१५ ऑगस्ट २०२१,१४ ऑगस्ट २०२२ असे तीन वेळा उपोषण करण्यात आली. मात्र तरीही प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी गावच विक्रीस काढले आहे.

 

Web Title: 'Here is the village to sell'; Villagers have put the village up for sale for the road, bidding will be held on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.