गंगाखेडचे सुपुत्र जवान विष्णू व्यंकोबा बढे यांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:41 PM2022-09-08T15:41:22+5:302022-09-08T15:42:36+5:30
हैदराबाद येथिल सैनिक हाॅस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
गंगाखेड ( परभणी ): गंगाखेड तालुक्यातील पाढरगावचे सुपुत्र जवान विष्णू व्यंकोबा बढे ( ३५ ) यांना सिकंदराबाद येथे कर्तव्यावर असताना बुधवारी सायंकाळी वीरमरण आले. त्यांच्यावर शुक्रवारी गंगाखेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
जवान विष्णू बढे सिकंदराबाद येथे भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर होते. कर्तव्यावर असताना १० दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. हैदराबाद येथिल सैनिक हाॅस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आईवडील, तीन भाऊ असा परिवार आहे.
जवान विष्णू बढे यांचे प्राथमिक शिक्षण पाढरगाव येथेच झाले होते. सन २००५ साली त्यांची सैन्य दलात निवड झाली. त्यानंतर ते सिकंदराबाद येथे कर्तव्यावर होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे वास्तव्य गंगाखेड येथे होते. त्यांचे पार्थिव गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत गंगाखेड येथे पोहचण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालय येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.