अहो गुरुजी, आम्ही पुस्तकांशिवाय शिकायचे तरी कसे? पाठ्यपुस्तक योजनेत ३० टक्के पुस्तकांची तूट
By ज्ञानेश्वर भाले | Published: June 13, 2024 06:21 PM2024-06-13T18:21:16+5:302024-06-13T18:21:49+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित असलेल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शासन स्तरावरून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात.
परभणी : शासन स्तरावरून विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना आहेत. परंतु त्या तोडक्या स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर येत असल्यामुळे संबंधितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. संबंधित पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणे, अपेक्षित असताना सुद्धा पटसंख्येनिहाय पुस्तके प्राप्त न झाल्यामुळे अनेक विद्यार्थी या पुस्तकांपासून पुढील काही दिवस वंचित राहणार असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सांगा गुरुजी, आम्ही पुस्तकांशिवाय शिकायचे तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित असलेल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शासन स्तरावरून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा प्रयत्न असतो. मात्र यंदा विद्यार्थी संख्येनिहाय पुस्तके प्राप्त न झाल्याने कुणाला पुस्तके द्यावी आणि कुणाला देऊ नये, असा प्रश्न संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांना पडला आहेत. पहिली ते आठवीच्या जिल्ह्यातील साधारण सव्वा दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन होते. मात्र वर्गनिहाय प्राप्त झालेल्या पुस्तकाच्या संचनुसार साधारण वर्गनिहाय २० ते ३० टक्के पुस्तकांची तूट असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहेत.
एका विद्यार्थ्याला चार संच
दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शासन स्तरावरून गत दोन वर्षापासून एकाच पुस्तकात सहा विषयांचा अभ्यासक्रम दिला आहेत. त्यामुळे विद्यार्थी सोयीनुसार एकाच पुस्तकातच्या आधारे सर्व विषयांचा अभ्यास करत आहे. यात एका विद्यार्थ्याला चार संच देण्यात येत असून प्रथम आणि द्वितीय सत्रात प्रत्येकी दोन अशा चार पुस्तकांचा संच शाळेच्या माध्यमातून मिळतो. मात्र यंदा पुस्तकांचे संच कमी आल्याने काही विद्यार्थ्यांना पुढील काही दिवस पुस्तकांची वाट पाहावी लागणार आहे. यासह गत वर्षीच्या विद्यार्थ्यांकडून जुने पुस्तके घेत ज्या मुलांना पुस्तके मिळाली नाही, त्यांना देण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांना पुस्तके
शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांसह शंभर टक्के खाजगी अनुदानित असलेल्या सर्व शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ त्यांच्या विद्यार्थी पटसंख्येनिहाय देण्यात येतो. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १ हजार १२५ तर खाजगी शंभर टक्के अनुदानित असलेल्या ११६ शाळांचा समावेश आहे.
---- तालुकानिहाय पुस्तकांच्या संचास पात्र विद्यार्थी
परभणी ७६४३६
पूर्णा २१२६८
जिंतूर ३६२५३
पाथरी १६९२३
मानवत १३७८५
सेलू २११७६
गंगाखेड २२७०२
पालम १०५०५
सोनपेठ ८२९५
एकूण २२७३४३