HHC Exam: कॉपीला बसला आळा, मात्र पहिल्याच पेपरला १४८२ विद्यार्थांची दांडी
By मारोती जुंबडे | Published: February 21, 2023 05:43 PM2023-02-21T17:43:25+5:302023-02-21T17:43:53+5:30
पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ५९ केंद्रांवर २४ हजार ७१ विद्यार्थ्यांना बसविण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती.
परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवारपासून बारावीची परिक्षा घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात ५९ परिक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरसाठी २४०७१ विद्यार्थी बसणार होते. त्यापैकी २२५८९ जणांनी हा पेपर दिला असून पहिल्याच दिवशी १४२८ विद्यार्थांनी दांडी मारल्याचे शिक्षण विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
मंगळवारी शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील ५९ केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर सकाळी ९.३० पासूनच गर्दी केली होती. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळली जावी म्हणून अनेक केंद्रावर त्यांना वेळेपूर्वीच वर्गात प्रवेश देण्यात आला. जिल्ह्यातील ५९ केंद्रावर २४ हजार ७१ पैकी २२ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला. उर्वरित १ हजार ४८२विद्यार्थी गैरहजर होते. यावेळी परीक्षा केंद्रावर ५९ बैठे पथकासह भरारी पथके शिक्षण मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कॉपीला बसला आळा
जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ५९ केंद्रांवर २४ हजार ७१ विद्यार्थ्यांना बसविण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये २२५८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ५९ बैठे पथकांसह भरारी पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी जिल्ह्यात कुठेही कॉपीचा प्रकार घडला नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.