परभणीत लाभार्थ्यांनी केली नोटिसांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:52 PM2018-11-17T23:52:11+5:302018-11-17T23:52:35+5:30
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने लाभार्थ्यांना दिलेल्या जप्तीच्या नोटिसांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली़ हडको बचाव कृती समितीच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने लाभार्थ्यांना दिलेल्या जप्तीच्या नोटिसांची शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली़ हडको बचाव कृती समितीच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले़
शहरातील वांगी रोड भागात १९८४ मध्ये हडको वसाहत निर्माण करण्यात आली आहे़ ५९४ पैकी ५५२ गाळ्यांचे वाटप एससी, एसटी, मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना करण्यात आले़ २००४ पर्यंत असलेली मुदत संपली़ लाभार्थ्यांनी पैशांचाही भरणा केला़ शहरात रमाई घरकूल योजना व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करीत असतानाच म्हाडाने मात्र वसुलीसाठी नोटिसा पाठविल्या आहेत़ या नोटिसा तत्काळ रद्द कराव्यात, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले़
मुदतीत पैसे भरल्यानंतरही म्हाडा कार्यालयाकडून जाणीवपूर्वक चक्रवाढ व्याज लावून नागरिकांना वेठीस धरले जात आहे़ हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी दिला़ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी हडको परिसरातून मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नोटिसांची होळी करुन म्हाडाचा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेऊन त्यांना सत्य परिस्थिती आणि झालेल्या अन्यायाची माहिती देण्यात आली. भारिप बहुजन महासंघाचे संदीप खाडे, अरुण लहाने, चंद्रकांत लहाने, आशिष वाकोडे, नीलेश डुमणे, हर्ष खिल्लारे, राजन सारणीकर, खमर फुलारी, अक्षय आदमाने, आशाताई मालसमिंदर, द्वारकाबाई गंडले, कमलबाई मुळे, मंगल खरात, लताबाई निवडंगे आदींसह लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले होते़