परजातीय प्रियकरासोबत विवाह करण्यावर मुलगी ठाम, जन्मदात्यानेच गळा दाबून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 01:59 PM2024-05-06T13:59:58+5:302024-05-06T14:00:28+5:30
परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील नाव्हा येथे ऑनर किलिंगचा प्रकार
परभणी : दुसऱ्या जातीच्या प्रियकरासोबत विवाह करण्यावर ठाम असणाऱ्या १९ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना पालम तालुक्यातील नाव्हा येथे २१ ते २२ एप्रिलच्या दरम्यान घडली. पोलिसांना या घटनेची कुणकुण लागताच मयत मुलीच्या आई-वडिलांसह ८ जणांविरुद्ध पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नाव्हा येथील १९ वर्षीय मुलीचे गावातील एका तरुणावर प्रेम होते. मुलीचा प्रियकर दुसऱ्या जातीचा होता. त्यामुळे या प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह करू नये, असे मुलीच्या आई-वडिलांचे मत आणि विरोध होता. असे असले तरी मुलगी प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह करण्यावर ठाम होती. त्यामुळे रागावलेल्या वडिलाने २१ एप्रिल रोजी घरात झोपलेल्या मुलीचा रात्री गळा दाबून खून केला. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावा नष्ट करण्यात आला. मुलीच्या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या लोकांनाही घटनेची माहिती होती. पण याबाबत कोणीही पोलिसांना कल्पना दिली नाही. मात्र, पोलिसांना याबाबत गुप्तपणे माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यवाही करून गुन्हा दाखल केला.
यांच्याविरुद्ध गुन्हा
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडील बालासाहेब भीमराव बाबर, आई रुख्मिणीबाई बालासाहेब बाबर, अच्युत दत्तराव बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, आबासाहेब रुस्तुमराव बाबर, गंगाधर योगाजी बाबर, गोपाळ अशोक बाबर यांच्याविरुद्ध शुक्रवारी (दि. ३) गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील तपास करीत आहेत. तपासासाठी फॉरेन्सिक पथक, एलसीबीसह पालम पोलिसांचे पथक घटनास्थळी असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मारोती कारवार व फौजदार डी. एस. जाधव यांनी दिली.