सरपंच, उपसरपंचांना मानधन; सदस्यांकडे मात्र दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:04+5:302021-02-17T04:23:04+5:30
परभणी : गावाचा कारभार हाकणाऱ्या सरपंच, उपसरपंचांना मानधन मिळत असले तरी सदस्यांना मात्र केवळ ग्रामसभेचा भत्ता मिळतो. त्यामुळे यात ...
परभणी : गावाचा कारभार हाकणाऱ्या सरपंच, उपसरपंचांना मानधन मिळत असले तरी सदस्यांना मात्र केवळ ग्रामसभेचा भत्ता मिळतो. त्यामुळे यात कुठे तरी दुजाभाव होत असून, सदस्यांनाही मानधन सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आणि नवीन गाव पुढाऱ्यांनी कारभार हातात घेतला. पूर्वीच्या प्रथेनुसार सरपंच, उपसरपंच यांना ग्रामपंचायतीच्या खर्चातून मानधन देण्याची तरतूद आहे. ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे मानधन दिले जाते. मात्र दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्यांना मात्र कोणत्याही मानधनाची तरतूद नाही. तसेच वाढत चाललेली महागाई लक्षात घेता, सरपंचांना दिले जाणारे मानधन तुटपुंजे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात वाढ करावी. तसेच सदस्यांनाही मानधन सुरू करावे, अशी मागणी होत आहे. सध्या तरी ग्रामसभेच्या वेळी होणारे चहापान आणि सभेच्या भत्त्यावरच सदस्यांची बोळवण होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, आता मानधन वाढीचा विषय पुढे येत आहे.
एकूण ग्रामपंचायती
५६६
निवडून आलेले सदस्य
४३००
सरपंच
५६६
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गावचा प्रमुख म्हणून काम करणाऱ्या सरपंचांना गावाच्या सर्व प्रश्नांकडे लक्ष द्यावे लागते. तेव्हा सरपंचांना मानधन वाढवून दिल्यास सरपंचांचा मानही वाढणार आहे.
सुरेश ढगे, सरपंच, वरखेड
ग्रामीण भागातील विकासाचे केंद्रबिंदू असणाऱ्या ग्रामपंचायतीचा कारभार करणाऱ्या सरपंचांना गावचे कारभारी म्हटले जाते. त्यांच्यावर जबाबदाऱ्याही मोठ्या आहेत. आमदार, खासदारांना मोठ्या प्रमाणात मानधन दिले जाते, मग सरपंचांना का नाही?
संतोष लाडाने, सरपंच, केकरजवळा
गाव पातळीवर महत्त्वाचे पद असलेल्या सरपंचांचे मानधन वाढविण्याबरोबरच सदस्यांनाही मानधन सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांची मानधन वाढ होणे आवश्यक आहे.
नारायण आढावा, सरपंच बाणेगाव, ता.पाथरी