उत्कृष्ट कार्याचा सन्मान! राजेंद्र शिरतोडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
By राजन मगरुळकर | Published: January 25, 2024 05:56 PM2024-01-25T17:56:14+5:302024-01-25T17:56:36+5:30
परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत
परभणी : जिल्हा पोलीस दलातील ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र श्रीरंग शिरतोडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यासह देशभरात विविध तपासाची कामे सोबतच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस कर्मचारी ते अधिकाऱ्यांपर्यंतच्या अनेकांचा सन्मान करण्यात येतो. या निमित्ताने राष्ट्रपती पदक सोबतच पोलीस महासंचालकांचे पदक आणि विविध पुरस्कार जाहीर केले जातात. परभणी ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र श्रीरंग शिरतोडे यांना यंदाचा राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. राजेंद्र शिरतोडे हे परभणी पोलीस दलात मागील एक ते दीड वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई, ठाणे, मुंबई रेल्वे, वर्धा आदी ठिकाणी कामे केली आहेत. मुंबई ब्लास्ट सोबतच वर्धा येथील उत्कृष्ट कामाबद्दल हा त्यांचा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजते. दरम्यान, मागील वर्षी शिरतोडे यांना राज्याच्या पोलिस महासंचालकांचे विशेष पदक जाहीर झाले होते. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी ते विशेष कार्याबद्दल गौरविणे जाणार आहेत. यामध्ये राज्यपालांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण आगामी काळामध्ये होणार आहे. जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी राजेंद्र शिरतोडे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल व पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मान केला.
जिल्ह्यातील दोन पोलीस ठाण्यांचे कार्य उत्कृष्ट
पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांच्या हस्ते जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांचा देखील स्थानिक कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जातो. यामध्ये २०२३ या कालावधीत कोतवाली आणि चारठाणा पोलीस ठाण्याने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस ठाणे म्हणून नावलौकिक मिळविले आहे.
या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी
जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार यांना स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रजासत्ताक दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गुटे, पोलीस कर्मचारी जगदीश पेंडलवार, सम्राट कोरडे, शेख मुन्नी, पोलीस कर्मचारी वसंत निळे, दत्ता चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ खान मोहम्मद खान पठाण, पोलीस कर्मचारी लक्ष्मण उपलेंचवार, अर्चना रेड्डी, आशा मुसळे, रवी कटारे, शिवाजी काळे, मोहित खान पठाण, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, शेख रफीक शेख मेहताब, देवराव रखमाजी झाडे, ओमप्रकाश कोटलवार, तरन्नुम बेगम अब्दुल हरून यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान केला जाणार आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, रवींद्र सांगळे यांनाही गौरविले जाणार आहे.