साठ वर्ष राज्य केल्यानंतरही गरिबी हटवणार म्हणायला लाज कशी वाटत नाही ? : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 07:43 PM2019-04-12T19:43:22+5:302019-04-12T19:44:58+5:30
६०-६० वर्षे राज्य केल्यानंतरही गरिबी हटवणार असे विरोधक म्हणत आहेत
पाथरी (परभणी ) : साठ-साठ वर्षे राज्य केल्यानंतरही गरिबी हटवणार असे राहुल गांधी, शरद पवार म्हणत आहेत. तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असे उपरोधिक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केली.
परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ पाथरी येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, उमेदवार संजय जाधव, आ.मोहन फड, आ.राहुल पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, सुरेश ढगे, माजी आ.विजय गव्हाणे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी परवा म्हणाले, गरिबी हटवणार, पवार साहेब म्हणाले आम्ही गरिबी हटवणार, आता राहुल गांधीचे पंजोबा देशाचे पंतप्रधान होते. तेव्हाही गरिबी हटवाचा नारा होता. राहुल गांधीच्या आजी पंतप्रधान झाल्या, तरीही गरिबी हटली नाही, उलट गरिबी वाढली. त्यानंतर त्यांचे वडील पंतप्रधान झाले, त्यांनीही तोच नारा दिला, मग त्यांच्या आई या ठिकाणी पंतप्रधान झाल्या. गरिबी हटली नाही, गरिबी वाढली. आता पुन्हा ते आम्हाला निवडून द्या, गरिबी हटवतो, असे म्हणत आहेत. ६०-६० वर्षे राज्य केल्यानंतरही गरिबी हटवणार असे विरोधक म्हणत आहेत, यांना लाज कशी वाटत नाही? असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस- राष्ट्रवादीचे एकच धोरण आहे, ते म्हणजे गरिबी नव्हे तर त्यांची, त्यांच्या नेत्यांची, चेल्याचपट्यांची गरिबी हटविणे, त्यांना गरिबांविषयी काहीही घेणे-देणे नाही. राहुल गांधींची सर्व भाषणे काल्पनिक आहेत. त्यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांना गरिबीविषयी काहीही घेणे-देणे नाही, असे वाटते. ज्या प्रमाणे टीव्ही सिरियलच्या आधी एक सूचना येते, त्यात मालिकेतील सर्व पात्र, कथानक काल्पनिक आहे, त्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. पहायचं असेल तर तुमच्या स्वत:च्या भरोस्यावर बघा, तुम्ही त्याला खर मानलं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. आम्ही केवळ मनोरंजनाकरीता ही मालिका दाखवत आहोत. तसचं राहुल गांधींचे भाषण सुरु होताना टीव्हीवाले अशा सूचना देतील, अशीही उपरोधिक टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी मुख्यमंत्री म्हणाले की, ओपनिंग बॅटस्मन व कॅप्टनने सामना सुरु होण्यापूर्वीच निवृत्ती घेतली. पराभवाच्या भितीने ते मॅचच खेळले नाहीत आणि हरलेल्या मनाने कोणीही निवडून येऊ शकत नाही, याची त्यांना जाणीव आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.