किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? शिक्षकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:59+5:302021-06-19T04:12:59+5:30
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने ...
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही शिक्षकांना अन्य शैक्षणिक कामे करण्यासाठी शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात शिक्षक संचालकांनी ५० टक्के शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत, तर परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नेमका कोणाचा आदेश मानावा, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. प्रशासकीय पातळीवरूनच याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिक्षकांमधून करण्यात येत आहे.
संचालकांच्या पत्राचे काय
पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाच्या सर्व शाळा, महाविद्यालयांत शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के अनिवार्य राहील.
दहावी व बारावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के राहील. तसेच सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची उपस्थिती १०० टक्के राहील.
जि.प.च्या पत्राचे काय?
जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के राहील.
कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे सर्वांना अनिवार्य राहील.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १०० टक्के उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे.
ज्या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे, त्या जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या अनुषंगाने शिक्षण संचालकांचे आदेश आहेत. परभणी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती १०० राहण्याचा आदेश काढला आहे.
- सुचेता पाटेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, परभणी
शाळेत विद्यार्थी उपस्थित नसल्यामुळे १०० टक्के शिक्षकांची आवश्यकता नाही. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती ठेवून ऑनलाईन अध्यापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
- सनीदेवल जाधव, शिक्षक
शिक्षण संचालकांच्या आदेशाप्रमाणे शाळेत ५० टक्के उपस्थिती ठेवून ५० टक्के शिक्षकांकडून ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी करावी. त्यामुळे शिक्षक विद्यार्थांच्या संपर्कात येणार नाहीत. परिणामी दोघेही सुरक्षित राहतील.
- बळीराम जाधव, शिक्षक