विलीनीकरणासाठी आणखी किती वाट पहायची,कर्जबाजरीपणाने व्यथित बस चालकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 01:55 PM2022-03-12T13:55:55+5:302022-03-12T13:58:15+5:30
चालकाने टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
जिंतूर ( परभणी ) : जिंतूर आगारातील बसचालक मुजफ्फरखा जाफरखा याने भोगाव शिवारात विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. आज शनिवारी (दि.12) सकाळी मुजफ्फरखा उर्फ मुज्जु यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
गेल्या चार महिने दहा दिवसापासून एसटीचा संप सुरू असून संपामुळे मुजफ्फरखा कर्जबाजारी झाला होता. काल दि.११ मार्च रोजी न्यायालयाची सुनावणीसाठी तारीख होती. न्यायालयात निर्णय लागेल याची तो वाट पाहत होता. पण गेल्या चार महिन्यापासून तारीख पे तारीख न्यायालयाकडून मिळत आहे. दि.११ मार्च रोजीही या प्रकरणी काहीही निर्णय झाला नाही. २२ मार्चची पुन्हा नवीन तारीख न्यायालयाने दिली. हे ऐकल्यावर मुजफ्फरखा निराश झाला.
न्यायालयाचा निर्णय काय येईल याची उत्सुकता त्याला होती. न्यायालयाची तारीख पुन्हा वाढल्याचे दि.११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता कळताच जिंतूर बस स्थानकावरून मुजफ्फरखा निघाला व सायंकाळी भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या विहिरीवर पोहोचून विषारी द्रव्य प्राशन करून त्याने विहिरीत उडी मारली. आज शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान मुजफ्फरखा याचे प्रेत आढळून आले.