किती ही लूट? बिट मार्केटमध्ये कांदा १५ रुपये, तर घराजवळ २० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:18 AM2021-07-31T04:18:48+5:302021-07-31T04:18:48+5:30
परभणी शहरात थेट शेतकऱ्यांनी पिकविलेला तसेच शेतकऱ्यांकडून बागवानांनी खरेदी केलेला माल बीट मार्केटमध्ये येतो. बीट मार्केट येथे दररोज सकाळी ...
परभणी शहरात थेट शेतकऱ्यांनी पिकविलेला तसेच शेतकऱ्यांकडून बागवानांनी खरेदी केलेला माल बीट मार्केटमध्ये येतो. बीट मार्केट येथे दररोज सकाळी ६ ते ११ या वेळेत भाजीपाला विक्रीची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. यानंतर हाच भाजीपाला शहरातील ४ प्रमुख भाजीपाला विक्री केंद्र व गल्लोगल्ली विक्रेत्यांकडून किरकोळ स्वरूपात विकला जातो. अर्धा किलोपासून ते १ किलो, २ किलोपर्यंत भाजी खरेदी करताना पडणारा दर आणि बिट मार्केटमध्ये याच भाजीचा प्रति किलो पडणारा दर यात कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त २० रुपये किलोचा फरक असतो. यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला घरापर्यंत आल्यावर काहीसा महाग दराने खरेदी करावा लागत आहे.
बीट मार्केटमध्ये कांदा १५ रुपये, गावात २० रुपये किलो
शहरात कांद्याची विक्री दररोज मोठ्या प्रमाणावर होते. यामध्ये किलोचा दर बीट मार्केटमध्ये १५ रुपये तर घरोघरी गल्लीत विक्रेत्यांकडून याच कांद्याचा दर २० रुपये किलो एवढा असल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले.
पिकवतात शेतकरी जास्तीचा पैसा तिसऱ्याच्या हातात
भाजीपाल्याची विक्री करण्यापूर्वी भाजीपाला पिकवणारे शेतकरी मोठ्या आशेने नफा होईल, या उद्देशाने भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, हा माल बागवान तसेच ठोक विक्रेते खरेदी करतात. यामध्ये कमी प्रमाणात नफा शेतकऱ्याला मिळतो. मात्र, ठोक विक्रेते हाच भाजीपाला किरकोळ विक्रेत्यांना वाढीव दराने विकून जास्तीचा पैसा कमवीत आहेत. यानंतर भाजीपाला विक्रेते थोडीशी दरवाढ करून स्वतः नफा कमवतात.
हा बघा दरामधील फरक (प्रति किलो दर)
भाजीपाला बीट मार्केट थेट ग्राहक
कांदा १५ २०
वांगे ४० ६०
बटाटे १५ २०
टमाटे २० ३०
फूलकोबी ३० ४०
पत्ताकोबी २० ३०
पालक ४० ६०
मेथी ८ १०
काकडी २० ३०
गवार ४० ६०
शेवगा ६० ८०
कारले ४० ६०
मिरची ४० ६०
कोथिंबीर ८० १००
एवढा फरक कसा ?
भाजीपाला विक्री करण्यासाठी ठोकमधून खरेदी करताना त्याचा भाव कमी पडतो. सध्या आवक कमी झाली आहे. यामुळे भाव तेजीत आहेत. - सुधाकर पिंपरकर.
दररोज सकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी बीट मार्केटमध्ये जाणे आणि आणने याची मेहनत असते. यात हाच भाजीपाला दारोदारी जाऊन विक्री करण्यासाठी दोन पैसे आमच्या हाती पडतात. - अशोक पिंपरकर.
अर्धा-पाव, किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही
दारावर येणारा भाजीपाला महाग मिळत असला तरी तो घ्यावाच लागतो. कारण बीट मार्केटमध्ये ये-जा करण्यास वेळ, पैसा अधिक खर्च होतो. यात याच दरात घरासमोर भाजीपाला मिळत आहे. - राजश्री जोशी.
घरी प्रत्येकाची भाजीची आवडनिवड असते. यामुळे दररोज २ भाजी लागतात. त्यापण अर्धा पाव. एवढ्या किरकोळ भाजीसाठी घरी अनेक वर्षांपासून येणाऱ्या विक्रेत्याकडूनच भाजी खरेदी केली जाते. पैशांचा हिशोब महिनेवारी होतो. यामुळे थोडा-बहूत फरक सहन करतो. - स्मिता डावरे.