डेटा प्लसला कसे रोखणार ? छत्रपती शिवाजी पुतळा परिसरात ७ जण विनामास्क, दोघांचा हनुवटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:29+5:302021-08-12T04:22:29+5:30
परभणी : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिक मास्कचा वापर न करता बिनधास्त फिरत असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ...
परभणी : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नागरिक मास्कचा वापर न करता बिनधास्त फिरत असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मंगळवारी दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान केलेल्या पाहणीत आढळून आले.
जिल्हा प्रशासनाने तसेच पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविणे सुरू केले असले तरी नागरिकांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाहणी केलेल्या अर्ध्या तासात जवळपास २०० ते ३०० दुचाकीधारक या मार्गाने गेले. यातील ७ जण विना मास्क पडकण्यात आले तर २ जण रुमाल हनुवटीला गुंडाळून जात होते. त्यांना मास्क सुस्थितीत घालण्याचा समज देण्यात आला. पोलिसांकडून अशा वाहनधारकांना पकडून त्यांना दंड लावण्याची मोहीम जोरात सुरू आहे.
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई
शहरातील वर्दळीच्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वसमत रोड, बसस्थानक, स्टेडियम परिसर, डॉक्टर लेन या चारी बाजूने दिवस-रात्र वाहनधारक येतात. या ठिकाणी वाहनावर मास्क न घालता फिरणाऱ्या वाहनधारकास पकडून थेट २०० रुपयांचा दंड लावला जात आहे. पोलीस असेपर्यंत ही मोहीम जोरात सुरू आहे. पोलिस नसल्यावर मात्र वाहनधारक बिनधास्त नियम मोडून फिरत आहेत.
पोलिसांच्या तोंडाला होते मास्क
परभणी शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक शाखेच्या नियुक्त पोलिसांना मास्क तोंडाला लावण्याचे बंधनकारक केले आहे. यानुसार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कार्यरत तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मास्क दिसून आले. त्यांच्याकडून नियम पाळला जात असल्याने ते वाहनधारकांना नियम मोडल्यावर दंड लावत असल्याचे दिसून आले.
काहीजण सुसाट
वाहतूक शाखेचे ३ पोलीस मंगळवारी दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान कारवाई करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर तसेच अन्य फिक्स पाँइंटवर उभे होते. या कर्मचाऱ्यांकडून कारवाई होत असल्याचे दिसताच काही वाहनधारक वाहने सुसाट नेताना दिसून आले. मात्र, अशा वाहनधारकांच्या नंबर प्लेटचे छायाचित्र काढून त्यांना दंड लावण्यात आल्याचे दिसून आले. दंड लावलेल्या वाहनधारकांकडे दंडाचे सुटे पैसे नसल्याने सुट्टे पैसे आणण्यासाठीही कर्मचाऱ्यांना पळापळ करावी लागल्याचे दिसून आले.