तिसरी लाट कशी रोखणार? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:13 AM2021-07-21T04:13:53+5:302021-07-21T04:13:53+5:30
परभणी : जिल्ह्यात ५२ टक्के कर्मचाऱ्यांनीच दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे उपचार करणारे कर्मचारीच जर लस घेत नसतील तर ...
परभणी : जिल्ह्यात ५२ टक्के कर्मचाऱ्यांनीच दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे उपचार करणारे कर्मचारीच जर लस घेत नसतील तर तिसरी लाट रोखायची कशी? असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धा असलेल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण वाढविण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर कोरोनापासून पूर्ण सुरक्षितता मिळणार आहे. मात्र, जिल्ह्यात ५१ टक्के आरोग्य कर्मचारी आणि ५३ टक्के कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. इतरांचा दुसरा डोस रखडला आहे. हे कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याने इतरांना लसीकरणाचे आवाहन कसे करायचे? असाही प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ७ हजार ३१९ आरोग्य कर्मचारी आणि १५ हजार २२८ कोरोना योद्धे असलेल्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण लसीकरण केले आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
लसीकरणाबाबत उदासनीता का?
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. मात्र, सुरुवातीच्या काळात लस सुरक्षित आहे का? यावर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच संभ्रमावस्था होती. ती हळूहळू दूर झाली. मात्र, अजूनही या कर्मचाऱ्यांचे लसीकरण रखडले आहे.
जिल्ह्यात कोविन ॲपला नोंदणी करताना काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मोबाइल क्रमांकाचा वापर लसीकरणाच्या नोंदणीसाठी केला नाही. इतर मोबाइल क्रमांक देऊन त्यांनी लसीकरण केले. त्यामुळे ते कोविन ॲपला जुळत नाही.
कोरोना संसर्ग आता कमी झाला आहे. काही कर्मचारी स्वत:च्या ॲन्टिबॉडीज तपासून घेत आहेत. लसीकरणापूर्वी बऱ्यापैकी ॲन्टिबॉडीज वाढलेल्या असतील तर लस घ्यायची कशाला? या भावनेतून काही कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे.
कोरोना संसर्ग काळात अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर किमान दोन महिने लस घेऊ नये, असा सल्ला या कर्मचाऱ्यांना दिला जात आहे. हेदेखील लसीकरण कमी होण्याचे कारण आहे.
सीईओंनी दिला इशारा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेणे बंधनकारक आहे. विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे. लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.
एकही डोस न घेतलेले कर्मचारी
आरोग्य : २८९४
फ्रंटलाइन : १६१