पीक कर्ज कसे फेडावे; या चिंतेतून शेतकऱ्याची आत्महत्या
By मारोती जुंबडे | Published: August 11, 2022 03:59 PM2022-08-11T15:59:12+5:302022-08-11T15:59:33+5:30
शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते.
मानवत (परभणी) : तालुक्यातील मगर सावंगी येथील येथील ५५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने कुटुंबावर असलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील मगर सावंगी येथील शेतकरी ज्ञानोबा ऋषी मगर (५५) यानी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कोल्हा या बँकेत त्याचे नावे घेतलेले १ लाख ५० हजार रुपये व पत्नी मंजुळा ज्ञानोबा मगर हिचे नावे घेतलेले १ लाख ३० हजार रुपये, असे एकूण २ लाख ८० हजार रुपयाचे पीक कर्ज कसे फेडावे या चिंतेत होते. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते. कर्ज फेडण्याच्या चिंतेतून बुधवारी दुपारी २ वाजता आपल्या राहत्या घरात लोखंडी ईगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शवविच्छेदन तालुक्यातील कोल्हा येथील आरोग्य केंद्रात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, एक मुलगी असा परिवार आहे. रात्री ८ वाजता मगर सावंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्जेराव मगर यांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे हे करत आहेत.