मानवत पोलिसांनी नष्ट केला २३ लाखांचा गुटखा
By ज्ञानेश्वर भाले | Published: August 26, 2022 05:32 PM2022-08-26T17:32:41+5:302022-08-26T17:33:38+5:30
संबंधित गुटखा नष्ट करण्यात यावा, असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते.
परभणी : सहा महिन्यांपूर्वी मानवत पोलिसांनी विविध कारवायांत जप्त केलेला २३ लाखांचा गुटखा गुरुवारी जाळून नष्ट करण्यात आला.
अवैध गुटखा विक्री, साठा करणे याविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतात. दरम्यान, १५ मार्चला ५३ हजार ६६७ रुपयांचा, २३ मार्चला १८ हजार ३४० रुपयांचा, १९ जूनला गोलाईत नगरात कारवाई करून ५ हजार ७५० रुपयांचा आणि २१ जूनला बुलडाणा जिल्ह्यातील २२ लाख ३१ हजार ८२९ रुपयांचा असा एकूण २३ लाख ९ हजार ५८६ रुपयांचा गुटखा पोलिसांनी तालुक्यातील विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत जप्त केला होता.
संबंधित गुटखा नष्ट करण्यात यावा, असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते. या आदेशावरून गुरुवारी पंचांसमक्ष पोलीस ठाणे परिसरात गुटखा नष्ट करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, सह पोलीस उपनिरीक्षक गुलाब घुगे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी ए.एम. तमडवार उपस्थित होते.