बालविवाहानंतर बाहेर गाव गाठले; नराधम पतीने अल्पवयीन पत्नीच्या गुप्तांगावर चाकूचे वार केले
By मारोती जुंबडे | Published: May 25, 2023 04:16 PM2023-05-25T16:16:39+5:302023-05-25T16:17:39+5:30
या प्रकरणी २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
चारठणा: अल्पवयीन पत्नीच्या गुप्तांगावर चाकूने तीन वार करत फरार झालेल्या आरोपींसह २२ जणांविरोधात २४ मे रोजी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिंतूर तालुक्यात प्रशासनाचा आदेश धुडकावून अल्पवयीन मुलींचे लग्न लावले जात असल्याचे दिसून येत आहे.
जिंतूर तालुक्यातील असोला येथील एका अल्पवयीन मुलींचे १४ मार्च २०२३ रोजी कवडा येथील जयवंत मुरली चव्हाण यांच्याशी लग्न लावून देण्यात आले. या बालविवाहाची कुणकुण कोणालाही लागू नये, यासाठी घरच्यांनी या नवदांपत्याला नाशिक येथे आपल्या मामाकडे पाठवून दिले. मामाने या दांपत्यासाठी एक रूम किरायाने करून दिली. या ठिकाणी हे नवदांपत्य १५ दिवसापासून राहू लागले. परंतु, एके दिवशी नवऱ्याने पत्नीच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. त्यानंतर आरडा ओरड झाल्याने स्थानिक नागरिकांनी सिन्नर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी मुलीला मामाच्या ताब्यात दिले. त्यानंतर उपचार घेऊन ही मुलगी परत माहेरी आल्यानंतर हा प्रकार बामणी पोलिसांना कळला.
बामणी पोलिसांनी ही मुलगी असुरक्षित असल्याने तिला परभणी येथील सखी वन स्टॉप सेंटरला पाच दिवसासाठी हजर केले. या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीने या मुलीचा जवाब नोंदविल्यानंतर तिने बालविवाह झाल्याचे सांगितले. बालविवाहाच्या प्रसंगी मुलीचे वय १५ वर्षे ४ महिने असल्याने बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक रवीकुमार चव्हाण यांनी बामणी पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी दिली. या फिर्यादीवरून २४ मे रोजी मुलीचे वडील, नवरा, मुलाची आई, भाऊ, भटजी यासह २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कृष्णा घायवट हे करीत आहेत.
‘‘मुलीचा जवाब नोंदवून घेतल्यानंतर पुन्हा कलम वाढू शकतात. भटजीसह काही आरोपींची नावे निष्पन्न होणे बाकी आहे.’’
- कृष्णा घायवट, सपोनी पोलीस स्टेशन बामणी.