पतीच्या मित्रानेच केला विवाहितेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:44 PM2019-03-04T18:44:01+5:302019-03-04T18:44:28+5:30
पतीच्या चिथावणीवरून मित्राने विवाहितेवर बलात्कार केला.
गंगाखेड (जि. परभणी)- शेतातील खळ्यावर पतीसोबत झोपण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर पतीच्या मित्रानेच बलात्कार केल्याची घटना १ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली असून, या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पती आणि त्याच्या मित्राविरूद्ध पिंपळदरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे़
गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील ३० वर्षीय विवाहिता व तिचा पती १ मार्च रोजी रात्री ९ वाजता शेतात तुरीच्या खळ्यावर झोपण्यासाठी गेले होते़ रात्री ११़३० ते १२ वाजेच्या सुमारास पतीने गावातील त्याच्या मित्राला फोन करून शेतात बोलावून घेतले़. हा माझा मित्र आहे़ तू त्याला तुझ्या जवळ झोपू दे असे पतीने पत्नीला सांगितले़. त्यास विवाहितेने नकार देताच पतीने जिवे मारण्याची धमकी दिली़. त्याने दिलेल्या चिथावणीवरून पतीच्या मित्राने सदरील विवाहितेवर बलात्कार केला.
दरम्यान, २ मार्च रोजी सकाळी पीडिता घरी परतल्यानंतर तिने झालेला प्रकार कोणालाही सांगितला नाही़. पती बाहेरगावी जाताच ३ मार्च रोजी पीडित विवाहितेने तिच्या सासूला घडलेला प्रकार सांगितला. रविवारी रात्री सासूसोबत पिंपळदरी पोलीस ठाणे गाठून पती व त्याच्या मित्राविरूद्ध तक्रार नोंदविली़. त्यावरून पीडितेचा पती व त्याचा मित्र अशा दोघांविरूद्ध बलात्कार करणे, चिथावणी देणे, जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी तपास करीत आहेत.