सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे प्रचाराचा धूमधडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:32+5:302021-01-08T04:52:32+5:30
मानवत : लोकसभा, विधानसभा निवडणुकांत सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असल्याचे दिसून आले. मात्र, ग्रामीण भागातील ...
मानवत : लोकसभा, विधानसभा निवडणुकांत सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असल्याचे दिसून आले. मात्र, ग्रामीण भागातील महत्त्वाची समजली जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सोशल मीडियाचा प्रभावी वापर उमेदवार करीत आहेत. सोशल मीडियातून होणाऱ्या या प्रचाराने ग्रामपंचायत निवडणुकीत आता चांगलीच रंगत आणली आहे.
‘हजार- पाचशेच्या नादी लागू नका, अभी नाही तो कभी नहीं, माणूस आपल्या हक्काचा, इतिहास वाचायला नाही तर लिहायला आलोय, आशा वेगवेगळ्या घोषणांचा उपयोग करून इच्छुक उमेदवार सोशल मीडियावर दणदणीत प्रचार करीत आहेत. दुसरीकडे अनेक व्हिडिओ, ऑडिओ, मिक्सिंग चित्रांची रेलचेल सोशल मीडियाच्या विविध साइट आणि ॲपवर दिसत आहे. काहींनी तर ‘भावी सरपंच’ असे पद लावून दम लय नावात, आमचा नेता लय पावरफुल, आया है राजा लोगो असे व्हिडिओ पोस्ट केलेले दिसून येत आहेत. विद्यमान सरपंचाचे पॅनल केलेल्या कामाचे फोटो काढून ते मिक्सिंग करून वचनपूर्ती अशा टॅग लाइन वापरून प्रचार करीत आहेत. सोशल मीडियापासून कोसोदूर असलेले अनेक जण प्रचाराच्या माध्यमातून चमकत असल्याचे दिसून येत आहे. अनेक उमेदवार प्रत्यक्ष भेटीवर भर देत असून प्रचार रंगात येण्याच्या अगोदर तीन- तीन प्रचाराच्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.
तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. ३३९ ग्रा. पं. सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी १००९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यापैकी ९९४ अर्ज वैध ठरले होते. १५ अर्ज अवैध ठरले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २७२ जणांनी माघार घेतली असून, प्रत्यक्षात ७१४ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
बॉक्स
सावळी येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. प्रभाग क्र. १ मधून अनुजाताई माणिकराव काळे, तुकाराम नामदेव काळे, ज्योतीताई जगन्नाथ शहाणे, प्रभाग क्र. २ मधून गोपाळ भगवानराव काळे, संजीवनी बालासाहेब काळे, आश्रूबाई महादेव वैराळ, प्रभाग क्र. ३ मधून संगीताताई बाळासाहेब काळे, विकास जगन्नाथ शहाणे, बाळासाहेब निवृत्ती तुपसमिंद्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांच्या विरोधात एकाही अर्ज आला नाही. त्यामुळे सावळी ग्रामपंचायत बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.