हिंमत असेल तर शिवसेनेने स्वबळावर लढावे; चंद्रकांत पाटलांचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 06:18 PM2021-10-22T18:18:18+5:302021-10-22T18:19:54+5:30
Chandrakant Patil News : युती तुटल्यानंतर राज्यात भाजपा हाच नंबर वन पक्ष असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
परभणी : भाजपा-शिवसेनेची ( BJP- Shiv Sena ) युती तुटल्यानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजपाची ताकद दिसून आली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने हिम्मत असेल तर स्वबळावर लढून दाखवावे, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला दिले आहे.
परभणीत भाजपाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी २१ ऑक्टोबर रोजी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, युती तुटल्यानंतर राज्यात भाजपा हाच नंबर वन पक्ष असल्याचे वारंवार दिसून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो अथवा इतर निवडणुकांमध्ये भाजपा एक नंबरवर असून, शिवसेना ४ नंबरवर फेकली गेली आहे. शिवसेनेने ज्या पक्षांसोबत हातमिळवणी केली ते पक्षही या निवडणुकांमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीचे उत्तम उदाहरण आहे. याच निवडणुकीप्रमाणे देगलूर विधानसभेची निवडणूकही भाजपा जिंकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविकास आघाडी सरकारवर आरोप करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘या सरकारचे दररोज घोटाळे बाहेर पडत असून, किरीट सोमय्या यांनी कालच ग्रामविकास विभागाचा पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढला. विशेष म्हणजे ग्रामविकास विभागाला ही निविदा रद्द करावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार घोटाळेबाज असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
तर किरीट सोमय्यांना बोलवा
भाजपाचे किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे बाहेर काढत असून, त्यांच्यामुळे सरकारची झोप उडाली आहे. लवकरच किरीट सोमय्या यांचा नांदेड जिल्हा दौरा आहे. परभणी जिल्ह्यातही असे काही घोटाळे असतील तर किरीट सोमय्यांना येथे बोलवा, असे चंद्रकांत पाटील म्हणताच एकच हशा पिकला.