सातबारा उताऱ्यावर आईचे नाव पाहीजे, तर मग द्या, २० हजार; तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By मारोती जुंबडे | Published: April 20, 2023 05:41 PM2023-04-20T17:41:53+5:302023-04-20T17:42:04+5:30
मागील काही दिवसापासून शासकीय कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय काम केले जात नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
परभणी: गंगाखेड तालुक्यातील रूमणा जवळा सज्जाच्या तलाठी यांनी तक्रारदाराच्या आईचे नाव सातबारा उताऱ्यावर घेऊन फेरफार नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने परभणी शहरातील नवा मोंढा ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
मागील काही दिवसापासून शासकीय कार्यालयांमध्ये पैसे घेतल्याशिवाय काम केले जात नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच जिल्ह्यात होणाऱ्या एसीबीच्या कारवायावरुन दिसून येत आहे. गंगाखेड तालुक्यातील एका तक्रारदाराच्या आईस मा. न्यायालयाच्या आदेशाने त्यांच्या वडिलोपार्जित शेत जमिनीचा हिस्सा मिळाला. त्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदाराच्या आईचे नाव लावून फेरफार नोंद करण्याच्या कामासाठी रूमणा जवळा सध्याचे तलाठी यांनी तक्रारदारास २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याप्रकरणी तक्रारदाराने एसीबी कार्यालय गाठून आपली तक्रार दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलिस निरिक्षक सदानंद वाघमारे, बसवेश्वर जकीकोरे, चंद्रशेखर नीलपत्रेवार, मिलिंद हनुमंते, शेख मुख्तार, जनार्धन कदम यांनी सापळा रचला. त्यानंतर या पथकाने पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानंतर तलाठी शिल्पा किशनराव घाटोळ यांच्याविरुद्ध परभणी शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे हे करीत आहेत.
‘‘कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फि या व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक