प्राचीन पौराणिक आणि ऐतिहासिक वारशाचा उपेक्षित ठेवा- नृसिंह तीर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 02:14 AM2020-08-09T02:14:08+5:302020-08-09T02:14:11+5:30
मंदिरातील सुंदर रेखीव काम, हेमाडपंथी पद्धतीने खांबाची रचना...
परभणी : जिल्ह्यातील चारठाणा येथील नृसिंह मंदिरातील सुंदर रेखीव काम, हेमाडपंथी पद्धतीने खांबाची रचना व गाभाऱ्यातील शिवलिंग भाविकांच्या आराधनेला हाक देणारी असून, या ठिकाणी नृसिंहाचे वास्तव्य मानले जात असल्याने या स्थानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच पंचक्रोशीत हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
या मंदिराची रचना व पाया वेगळा असून अशा प्रकारचे मंदिर इतरत्र दिसत नाही. या मंदिराच्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे उंच पीठासन, भव्य प्रदक्षिणा मार्ग, अलंकरणविरहित पण मजबूत भव्य असे स्तंभ, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी रचना असून रंगशीला चौरस आहे. गाभाºयात शिवलिंग असून अंतराळ लगत उत्तर भागात अजून एक दुसरे शिवलिंग पाहावयास मिळते. मंदिरात पूर्वी नृसिंह मूर्ती असल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील नृसिंह जिंतूर तालुक्यातील वरूड येथील भक्ताच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्या भक्ताकरिता वरूडला गेला, असे सांगितले जाते. कदाचित वैष्णव भक्तांचा राजाश्रय संपल्यावर असे कथानक तयार झाले असावे, अशी आख्यायिका आहे. चारठाणा येथील नृसिंह मंदिराला दक्षिण आणि उत्तर बाजूने देखील प्रवेशद्वार असून मुख्य प्रवेश पूर्व बाजूने होतो. पूर्वाभिमुख मंदिराची पूर्व दिशा आणि गावाची पूर्व दिशा यात थोडा कोनात्मक फरक असून गावाच्या तुलनेत मंदिर तिरपे वाटते. मात्र अनेक वास्तुशास्त्र जाणकारांच्या मते मंदिराची पूर्व दिशा अगदी योग्य साधली गेली आहे. सभामंडपाच्या उत्तर भागात भिंतीत असलेल्या अर्धस्तंभावर पूर्वदिशेला तोंड करून एक स्तंभलेख आहे. एकंदरीत शिलालेखाचा संदर्भ घेतल्यास दुदुंभि संवत्सर १२०२ ला आले होते. यावरून हे मंदिर १३ व्या शतकातील असावे, याला आधार मिळतो. या मंदिराच्या पूर्व भागात बाहेर झिजत पडलेली शेषशायी विष्णूमूर्ती अतिशय सुंदर असून समुद्रमंथनाचा देखावा कोरलेला आहे. याच भागात एक भग्न यज्ञवराह देखील सापडला असून सध्या तो उत्तर भागातील एक देवकोष्ठात ठेवला गेला आहे.
उत्तर चालुक्य काळातील अवशेष!
या मंदिराच्या दक्षिण भागात नैर्ऋत्य दिशेला शेतात अजून एक शिवालय सापडले असून, १९९३ ला तिथे उत्खनन झाले होते. मात्र, निधीअभावी ते काम अपूर्ण राहिले. मंदिरालगत दक्षिण भागात आणखी २ मंदिरांचे अवशेष सापडले असून, तिथे देखील शिवपिंडी दिसून येतात. यादव काळापूर्वी असलेल्या वैभवशाली उत्तर चालुक्य काळाचे अवशेष या गावाला प्राचीन इतिहास आहे, हे सिद्ध करतात.
संशोधनाची गरज
चारठाण्याचा प्राचीन इतिहास हा नदीकिनारी असलेल्या मंदिर परिसरात दडलेला असून शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून अभ्यास व्हायला हवा. कारण कोणतीही संस्कृती नदीकिनारीच विकसित झालेली पाहावयास मिळते. या दृष्टीने नवीन संशोधन व मांडणी व्हायला हवी. त्यासाठी सर्व मंदिर स्थापत्यप्रेमींनी पुढाकार घेऊन गावाला जागतिक वारशात समावेशासाठी प्रयत्न करावेत, असे मत मूर्तिशास्त्र अभ्यासक लक्ष्मीकांत सोनवटकर यांनी व्यक्त केले.