मूल्यवर्धित शेतीसाठी आयआयटी मुंबईची शेतकऱ्यांना साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 06:45 PM2019-03-09T18:45:31+5:302019-03-09T18:49:17+5:30
कमी खर्चात उत्तम शेती आणि चांगला भाव मिळावा, यासाठी आयआयटीने संशोधन सुरू केले आहे.
- लक्ष्मण दुधाटे
पालम (जि.परभणी) : कृषी क्षेत्राची मदार बाजारपेठेवर पडल्यापासून शेती आणि शेतकऱ्यासमोरील आव्हान वाढत चालली आहे. पण, पिकाच्या मूल्यवर्धनाबरोबर कमी खर्चात उत्तम शेती आणि चांगला भाव मिळावा, यासाठी आयआयटीने संशोधन सुरू केले आहे. यात शेतमालावर प्रक्रिया आणि पॅकेजिंग करून बाजारात नेण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी एक संवादसत्र मुंबईतील आयआयटीत पार पडले. या सत्रात परभणीतील ३५ शेतकरी सहभागी झाले होते. त्यातून या संशोधन प्रकल्पाला गती मिळाली आहे.
शेतीत उत्पादन अधिक झाले तर भाव गडगडात आणि उत्पादन कमी झाले तर शेतकरी संकटात येते, अशी काहीशी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करुन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पिकांचे मूल्यवर्धन व्हावे, या हेतुने राज्य शासनाच्या इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेत ‘सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटीव्ह फॉर रुरल एरिया’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. परभणी येथील शेती सेवा ग्रुपचे रमेशराव दुधाटे गोळेगावकर, वझूर येथील दादा पवार व आयआयटीतील प्रा. विशाल सरदेशपांडे यांनी आयआयटी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व संवाद शिबीर घ्यावे, यासाठी पुढाकार घेतला.
ही संकल्पना आयआयटीमधील विभागप्रमुख प्रा.सतीश अग्निहोत्री यांना पटली. त्यातूनच कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन दिवस शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे संयुक्त प्रशिक्षण, संवाद शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी कमी करणे, कृषी व्यवसायातील संधी, प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पाणी व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, कमी खर्चात पाणी साठविण्यासाठी फोरोसिमेंट तंत्रज्ञान, कमी खर्चातील शीतगृह आणि कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे आदी विषयांवर हे प्रशिक्षण घेण्यात आले.
आयआयटीच्या इतिहासातप्रथमच शेतकरी प्रशिक्षण
माहिती आणि तंत्रज्ञान विषयात काम करणाऱ्या इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणाचा मान परभणी जिल्ह्याला मिळाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीशी सांगड घालण्याचा प्रयत्न या तीन दिवसांच्या प्रशिक्षणातून करण्यात आला.
प्रक्रिया उद्योग उभारणार
परभणी जिल्ह्यात ऊस व ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु, त्यावर फारशी प्रक्रिया होत नाही. त्यामुळे फायदाही होत नाही. आयआयटी संस्थेने विकसित केलेले मॉडेल आगामी काळात परभणीच्या शेतकऱ्यांसाठी वापरण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्वारी पिकाची पॅकिंग, सेंद्रीय गुळ उभारणीसाठी प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.
- विष्णू कऱ्हाळे, ताडकळस
शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊ
आयआयटी संस्थेच्या शास्त्रज्ञांसोबत तीन दिवस चांगली चर्चा झाली. कमी खर्चातील तंत्रज्ञानाची माहिती आम्हाला मिळाली. याचा फायदा शेती करताना नक्कीच होणार आहे. आमच्या अडचणी शास्त्रज्ञांना सांगितल्या असून, त्यावर उपाययोजना करण्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यामुळे प्रशिक्षणातून मिळालेल्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीत चांगले काम करु.
- गोविंद दुधाटे, शेतकरी
शेतकऱ्यांशी संवाद ठेवणार
शेती करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ व विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. यातून अनेक मॉडेल व तंत्रज्ञान विकसित झाले आहे. कमी खर्चातील तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे केवळ प्रशिक्षण देऊन थांबणार नाही. तर शेतकऱ्यांशी संवाद सुरु ठेवला जाईल.
- प्रा.विशाल सरदेशपांडे, आयआयटी, मुंबई