पालममध्ये नदीतील रेती अवैधरित्या उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:38+5:302021-01-02T04:14:38+5:30
पालम : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वाहणाऱ्या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा करून विक्री केली जात आहे. ...
पालम : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वाहणाऱ्या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा उपसा करून विक्री केली जात आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून निकृष्ट वाळूचा व्यवसाय तेजीत सुरू आहे.
पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात एकाही ठिकाणी वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. तसेच अंतेश्वर व डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरले आहे. त्यामुळे वाळू मिळणे कठीण झाले असून, वाळूचा भाव गगनाला भिडला आहे. बांधकाम करण्यासाठी वाळू लागत असल्याने याच संधीचा फायदा घेत वाळू चोरांचे टोळके सक्रिय झाले आहे. पालम शहरापासून जवळच असलेल्या लेंडी नदी, सेलू,पेंडू नदी व केरवाडी येथील गळाटी या छोट्या नद्यांच्या पात्रात निकृष्ट असलेल्या वाळूचा उपसा करून महागड्या दामात सर्रासपणे विकली जात आहे. ही वाळू पाण्याचा फवारा मारून स्वच्छ करून विकण्यात येत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असून, लाखोंचा महसूल बुडत आहे.