परभणीतील चारोटी यात्रा परिसरात स्कूलबॅगमध्ये पकडली अवैध दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 07:21 PM2019-01-15T19:21:53+5:302019-01-15T19:23:09+5:30
जिल्ह्यात अवैध दारु विक्री विरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे.
परभणी- चाटोरी येथील यात्रेत विक्री करण्याच्या उद्देशाने स्कूलबॅगमध्ये लपवून ठेवलेली दारु पोलिसांनी सोमवारी (दि. १४ ) सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास छापा टाकून पकडली.
जिल्ह्यात अवैध दारु विक्री विरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. चाटोरी येथे यात्रा सुरु असून या यात्रेत दारु विक्री करण्याच्या उद्देशाने दारुचा साठा केला जात आहे. या संदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. त्यावरुन या पथकाने चाटोरी परिसरातील जय महाराष्ट्र ढाब्याच्या शेजारील मोकळ्या जागेत छापा टाकला. त्यावेळी देशी आणि विदेशी दारुच्या ३० बाटल्या स्कूलबॅगमध्ये लपवून ठेवल्याचे आढळले.
या प्रकरणी आरोपी गजानन माणिकराव किरडे (२२) याच्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दारुच्या ३० बाटल्या आणि नगदी २ हजार रुपये असा ६ हजार ४१६ रुपयांचा माल जप्त केला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या आदेशावरुन सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.एम.देवकते, सुरेश डोंगरे, संजय शेळके, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, रामकिशन काळे, सय्यद मोईन आदींनी ही कारवाई केली.