ठिकठिकाणी होतेय अवैध दारूविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:23+5:302021-03-14T04:17:23+5:30
स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता देवगावफाटा : सेलू शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने सुंदर ...
स्वच्छतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता
देवगावफाटा : सेलू शहरातील मुख्य रस्त्यावर दुभाजक बनविण्यात आले आहेत. त्यावर वृक्ष लागवड केल्याने सुंदर दिसत असले, तरी या वृक्षांना वेळोवेळी पाणी दिले जात नाही. या शिवाय रस्त्यावरील धूळ वृक्षाच्या पानावर बसल्याने, प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होत नसल्यामुळे झाडांची वाढ खुंटत आहे. या ठिकाणी घाणीचे प्रमाणही वाढत आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
रानडुकराकडून नुकसान
देवगावफाटा: सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनीवर असलेल्या रब्बी पिकांची रानडुकराकडून नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांवर रानडुकरांनी हल्ला करून त्यांना जखमी केल्याच्या घटनाही घडत आहे. मात्र, याला वनविभागास सोयरसुतक नसल्याचा प्रकार समोर येत आहे.
सेलू तालुक्यात ॲप्रोच रस्ते खराब
देवगावफाटा: सेलू तालुक्यातील गावागावांना जोडणारे ॲप्रोच रस्ते खराब झाले असून, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्ता दुरुस्तीकडे मात्र लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे लक्ष नाही. दरवर्षी अंदाजपत्रक तयार केले जाते, पण पुढे कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
गतिरोधकास पांढरे पट्टे रंगवा...
देवगावफाटा : देवगावफाटानजीक नखाते हायस्कूलसमोर महामार्ग रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाजवळील पांढरे पट्टे नाहीसे झाल्याने, या ठिकाणी अनेक अपघात घडत आहेत, शिवाय शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. सा.बां.विभागाने या ठिकाणी तातडीने पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी होत आहे.