पालम तालुक्यात १३ ठिकाणांहून होतोय अवैध वाळू उपसा;माफियांपुढे प्रशासनही हतबल;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 07:16 PM2018-07-09T19:16:24+5:302018-07-09T19:17:30+5:30
पालम तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून १३ ठिकाणाहून वाळूचा वारेमाप अवैैध उपसा होत आहे.
परभणी : पालम तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून १३ ठिकाणाहून वाळूचा वारेमाप अवैैध उपसा होत आहे. स्थानिक प्रशासनालाही माफिया जुमानत नसल्याने यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यातून प्रशासनाचा महसूल मात्र बुडत आहे.
पालम तालुक्यात सावंगी भूजबळ ते दुटकापर्यंत गोदावरी नदीचे पात्र आहे. या नदीपात्रावर राहटी, दुटका, गुंज, पिंपळगाव, बरबडी, फरकंडा, आरखेड, उमरथडी, रावराजूर, धनेवाडी, सावंगी बुु. असे १३ वाळूचे घाट लिलावासाठी प्रस्तावित करण्यात आले होते; परंतु, यातील केवळ पिंपळगाव मु. व सावंगी थडी अशा दोनच घाटांचा लिलाव झाला आहे. या घाटातून सप्टेंबर २०१८ पर्यंत वाळू उपसा करण्याची मुदत देण्यात आली आहे. तालुक्यामध्ये १३ ठिकाणी वाळूचे घाट असताना केवळ दोनच घाटाचा लिलाव झाला आहे. या घाटावरुन अधिकृत उपसा होत असला तरी इतर घाटांवरुन मात्र वाळूचा वारेमाप उपसा होत आहे.
डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठाही कमी होत असल्याने वाळू उघडी पडत आहे. माफियांनी या घाटाकडेही मोर्चा वळविला असून यातूनही मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करुन परजिल्ह्यात साठे तयार केले जात आहेत. रावराजूर येथून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने महसूल यंत्रणेने दोन तराफे जाळून टाकत २०० ब्रास वाळू तहसीलमध्ये उचलून नेली. यानंतर वाळू उपसा बंद होईल, असे वाटत होते; परंतु, कितीतरी पटीने वाळू उपसा होत आहे.
पारवा, राहटी, दुटका, पिंपळगाव मु. या परिसरात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी कारवाईचा बडगाही उगारला होता. परंतु, जिल्हास्तरावरील अधिकारी परत गेल्यानंतर वाळूमाफिया पुन्हा उपसा करुन लाखो रुपयांचे वाळूसाठे तयार करीत आहेत. तालुक्यामध्ये मोठी कारवाई होत नसल्याने वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक राहिला नाही. बाहेर जिल्ह्यातील माफियांनी स्थानिकांच्या सहाय्याने वाळू उपस्याचा सपाटा लावला आहे. तहसीलदार तेजस्विनी जाधव यांनी कारवाईचा बडगा उगारला; मात्र त्यांना कर्मचाऱ्यांची साथ मिळत नाही. महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांशी वाळू तस्करांचे लागेबांधे असल्याने माफियांना कारवाईची कुणकुण लागते. स्थानिकस्तरावर १३ गावात दक्षता पथकाची स्थापना झाली. परंतु, प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे दक्षता पथकही कुचकामी ठरले आहे.
वाळू साठ्यासाठी गायरान जमिनीचा वापर
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन माफिया शेतामध्ये ठिकठिकाणी वाळू साठे तयार करीत होते; परंतु, महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाळूमाफियांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाळू न साठवता गायरान जमिनीवर साठे तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महसूल विभागाने जवळपास २ हजार २०० ब्रास वाळूसाठे जप्त केले होते. परंतु, वाळू माफियांनी यावरही डल्ला मारत वाळूसाठे लांबविले आहेत. वाळूसाठे चोरीला जावूनही तहसील कार्यालयाने अद्यापही सातबारावर बोजा टाकला नाही. तसेच वाळू चोरट्यावर गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे या विषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.
खुलेआम होते वाहतूक
स्थानिक प्रशासनाच्या वतीने ठोस कारवाई होत नसल्याने तालुक्यातील वाळू माफियांसह परजिल्ह्यातील माफियांनीही वाळू उपसा करण्यासाठी पालम तालुक्याकडे मोर्चा वळविला आहे. गोदावरी नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू उपसा करुन परजिल्ह्यात साठे केले जात आहेत. लातूर, अहमदपूर, लोहा, कंधार आदी भागात चार ब्रासच्या टिप्परला १८ ते २० हजार रुपये मिळत असल्याने वाळू माफियांनी परजिल्ह्यात साठे केले आहेत. तालुक्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाळू वाहतूक होत असताना स्थानिक प्रशासनाला मात्र ही वाहने कशी काय दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्रंदिवस वाहतूक होत असताना कारवाई मात्र होत नाही.