दुधना नदीपात्रातून अवैध वाळूउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:17 AM2020-12-31T04:17:54+5:302020-12-31T04:17:54+5:30
सेलू : तालुक्यात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दुधना नदीपात्रातून दिवस- रात्र अवैध वाळूचा उपसा केला ...
सेलू : तालुक्यात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दुधना नदीपात्रातून दिवस- रात्र अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. ट्रॅक्टरमधून सर्रास या वाळूची वाहतूक केली जात असून, यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. वाळूला सोन्याचा भाव आल्याने वाळू माफिया मालामाल होत आहेत. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तसेच ४ वर्षांनंतर निम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. अतिवृष्टीमुळे प्रकल्पात येणारे अतिरिक्त पाणी नदीपात्राव्दारे सोडण्यात आले. परिणामी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळू निर्माण झाली आहे. तसेच वाळू गटांचा लिलाव रखडल्याने वाळू माफियांनी नदीपात्रातून अवैध वाळूउपसा सुरु केला आहे. काजळी रोहिणा, राजा, डिग्रस खु., खेर्डा या गावांच्या शिवारातून वाहणाऱ्या नदीपात्रात थोडे पाणी असले, तरी त्यातून अवैध वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरव्दारे वाहतूक केली जात आहे. मंठा, वालूर, सेलू, देवगाव फाटा, जिंतूर आदी ठिकाणी ही वाळू वाहतूक केली जात आहे. एक ब्रास वाळू ६ ते ७ हजार रुपयांना विकली जात आहे.
अधिकारी निवडणुकीत व्यस्त : माफियांची चांदी
तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महसूलसह इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. नेमकी हीच संधी साधून वाळू माफियांनी दुधना नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी शासनाचा हजारो रूपयांचा महसूल बुडत आहे. दरम्यान, अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी मंडलनिहाय पथकांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी वालूर येथे अवैध वाळूउपसा करून या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.