गाेदावरी नदीतून अवैध वाळू उपसा जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:40+5:302021-03-08T04:17:40+5:30
गंगाखेड : वाळूची किंमत बाजारात १० हजार रुपये प्रतिब्रास झाली असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी ...
गंगाखेड : वाळूची किंमत बाजारात १० हजार रुपये प्रतिब्रास झाली असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे मनोबल वाढले आहे.
तालुक्यातील महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी, पिंप्री या गाव परिसरात गोदावरीचे पात्र आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची दररोज वाहतूक केली जाते. विशेषत: गोदावरी नदीपात्र महिनाभर भरून वाहिले. त्यामुळे ठिकठिकाणी वाळू निर्माण झाली आहे. त्यातच प्रशासनाकडून अपेक्षित वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात आले नाहीत. त्यामुळे बाजारात वाळूला मोठी मागणी आहे. ही मागणी भरून काढण्यासाठी व प्रतिब्रास १० हजार रुपयांप्रमाणे वाळू विकून अपाम पैसे मिळवण्याची संधी चालून आली असल्याने वाळू माफियांकडून दररोज जेसीबी व इतर साधनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. अनेक वेळा गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाईनंतर पुन्हा जोशाने वाळू उपसा केला जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
बीड जिल्ह्यात केली जाते वाहतूक
गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून रात्री-अपरात्री वाळू उपसा केला जातो. या वाळूची लातूर, नांदेड यासह बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोहोच केली जाते. त्यामुळे यातून वाळू माफियांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे शासनाचा कर बुडवून गोदावरी पात्राचे वाळवंट केले जात आहे.