गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:18 AM2021-02-24T04:18:37+5:302021-02-24T04:18:37+5:30
मागील एक वर्षापासून वाळूचे लिलाव रखडले होते. या काळात गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू उत्खनन करण्यासाठी यंत्रणा अधिक सक्रिय झाली. ...
मागील एक वर्षापासून वाळूचे लिलाव रखडले होते. या काळात गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू उत्खनन करण्यासाठी यंत्रणा अधिक सक्रिय झाली. महसूल आणि पोलीस यंत्रणेकडून काही कारवाया झाल्या खऱ्या; मात्र वाळू तस्करी कमी झाली नाही. पाथरी तालुक्यात नाथरा ते मुदगल या गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन सुरू आहे. मागच्या आठवड्यात पाथरी तहसीलदार श्रीकांत निळे यांनी दोन ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत वाहने जप्त केली आहेत. मात्र एकदा कारवाई झाली की महसूल यंत्रणा पुन्हा सैल पडते, असा अनुभव आहे. त्यानंतर वाळू चोरी करणारे अधिक सतर्क राहून वाळू वाहतूक करत आहेत. एक तर वाळूचा लिलाव होत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेची बांधकामे बंद पडली आहेत. नाइलाजाने वाजवी दराने वाळू खरेदी करावी लागत आहे. चोरट्या वाळूचा सर्वसामान्यांवर भुर्दंड पडत आहे तसेच महसूल आणि पोलीस यंत्रणेवर लक्ष ठेवण्यासाठी पहारेदार ठेवण्यात आल्याने कित्येक वेळा यंत्रणा वाळू वाहतुकीवर पावबंद घालण्यास असमर्थ ठरू लागली आहे. मुदगल वाळू घाटातून काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व यंत्रणेच्या डोळ्यादेखत नियमबाह्य पद्धतीने हजारो ब्रास वाळू उत्खनन झाले आहे. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
वाळूतून लाखोंची उलाढाल
दररोज गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उत्खननातून लाखोंची उलाढाल होते आहे. त्यामुळे चोरट्या वाळूत अनेकांना मोठा रस असल्याचे दिसत आहे.