'माझा खून होतोय, मला वाचवा'; मदतीसाठी पोलिसांना फोन करणाऱ्यावरच गुन्हा दाखल, पण का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 12:43 PM2022-03-12T12:43:06+5:302022-03-12T12:45:23+5:30
पोलिसांनी अधिक चौकशी करून फोन केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला असता सत्य उघडकीस आले
गंगाखेड (जि. परभणी) : माझा खून होतोय, मला वाचवा, असे म्हणून मदतीसाठी पोलिसांना फोन करणारा तळीराम मद्यधुंद अवस्थेत रस्त्याने नागरिकांना शिवीगाळ करीत जात असल्याची घटना गंगाखेड येथे ४ मार्च रोजी रात्री ८.३० च्या सुुुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गंगाखेड शहरातील नांदेड रस्त्यावर दत्त मंदिराजवळ नातेवाइकाकडे राहणाऱ्या गोपाळ सुधाकर चौरे या व्यक्तीने ४ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता दत्त मंदिराजवळून परभणी येथील पोलीस नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर फोन केला. त्यामध्ये माझा खून होतोय, मला वाचवा...असे चौरे पोलिसांना फोनवर म्हणाला. तसेच त्याने पोलिसांना मदतीसाठी आर्जव केली. त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाने गंगाखेड पोलिसांना वायरलेसद्वारे तातडीने माहिती दिली. त्यानंतर गंगाखेड पोलिसांचे पथक वाहनाद्वारे दत्त मंदिर येथे गेले. त्यावेळी संबंधित व्यक्ती तेथे आढळली नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी करून फोन केलेल्या व्यक्तीचा शोध घेतला.
तेव्हा फोन करणारी व्यक्ती रस्त्याने मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करीत जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची चौकशी केली असता त्याने घटनेविषयी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी या व्यक्तीला खाक्या दाखवला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल केल्याच्या कारणावरून आरोपी गोपाळ सुधाकर चौरे (देवळा, ता. अंबाजोगाई, ह. मु. गंगाखेड) याच्याविरुद्ध ठाणे अंमलदार महेश पांगरकर यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.