'फर्जी' शाहीदचे अनुकरण; घरीच दोनशेच्या नोटा छापल्या, टपरी चालकास पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 08:00 PM2023-03-15T20:00:52+5:302023-03-15T20:02:51+5:30
या प्रकरणात एकास अटक करण्यात आली असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
मानवत (परभणी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मानवत शहरातील खंडोबा रोड परिसरात धाड टाकून भारतीय बनावटीच्या चलनातील 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला अटक केली होती. विशाल संतोष खरात असे आरोपीचे नाव असून आज न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे, विशाल खरातने ' फर्जी' वेबसिरीज पाहून बनावट नोटा छापण्यास सुरुवात केल्याचे उघडकीस आले आहे.
शहरातील खंडोबा रोड परिसरातील विशाल संतोष खरात हा तरुण आपल्या घरात कलर प्रिंटरवरून 200 रुपयांच्या बनावट नोटा छापत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने मंगळवारी दुपारी 4:30 वाजता खंडोबा रोड परिसरात विशाल संतोष खरातच्या घरी छापा टाकला. यावेळी 200 रुपयांच्या 27 बनावट नोटा, 82 नोटांची प्रिंट, 11 अर्धवट प्रिंट, कलर प्रिंटर, रंगीत कागद, वाटर मार्क असे साहित्य आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी विशालला ताब्यात घेऊन सर्व साहित्य जप्त केले. आज न्यायालयाने आरोपीस 20 मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
वेबसिरीजपासून प्रेरणा, यु ट्यूबवरून धडे
विशाल संतोष खरात हा मागील तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या गाजत असलेली बनावट नोटावर आधारित वेबसिरीज 'फर्जी' पाहून प्रेरणा घेत विशालने युट्युबवरील व्हिडिओ पाहत प्रिंटींग तंत्र शिकले. त्यानंतर तो नोटा चलनात आणण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र तो पोलिसांच्या तावडीत सापडला. केवळ शौक पूर्ण करण्यासाठी त्याने हा प्रताप केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.