दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:15+5:302021-03-20T04:16:15+5:30
पाथरी : येथील पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. ...
पाथरी : येथील पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पाथरी पोलीस ठाण्यात एक पोलीस उपनिरीक्षक आणि एका सहायक पोलीस निरीक्षकाची वरिष्ठ कार्यालयाकडून तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे.
पाथरी येथील पोलीस ठाण्यात मागील काही वर्षांत एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षक अधिकारी कार्यरत होते. मात्र मागील काही महिन्यांपासून येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या तांत्रिक कारणाने इतरत्र बदल्या करण्यात आल्या. तसेच सहायक पोलीस निरीक्षक के.बी. बोधगिरे, बी.आर. टिप्पलवाड यांना पोलीस अधीक्षकांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना पोलीस मुख्यालयी हलवण्यात आले. तसेच पोलीस उपनिरीक्षक टोपाजी कोरके यांचे एका प्रकरणात निलंबन झाले. त्यामुळे येथील पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची पदे रिक्त झाल्याने अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले होते. मटका, गुटखा, पत्त्यांचे क्लब खुलेआम सुरू झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने १३ मार्चच्या अंकात ‘पोलीस अधिकाऱ्यांवर वाढला कामाचा ताण’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केेले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी सोनपेठ येथील सहायक पोलीस निरीक्षक पी.पी. सोमवंशी व परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यातील चिरंजीव दलालवाड या दोन अधिकाऱ्यांची पाथरी पोलीस ठाण्यात नियुक्ती केली.