खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी करा गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:16+5:302021-09-03T04:19:16+5:30
परभणी : पीओपीच्या गणेशमूर्ती घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी पाण्यात खाण्याचा सोडा वापरला तर पर्यावरणाचे संवर्धनही होईल आणि गणेशोत्सवही उत्साहात ...
परभणी : पीओपीच्या गणेशमूर्ती घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी पाण्यात खाण्याचा सोडा वापरला तर पर्यावरणाचे संवर्धनही होईल आणि गणेशोत्सवही उत्साहात साजरा करता येणार आहे.
जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. श्री विसर्जनाने या उत्सवाची सांगता होते. जुन्या प्रथेनुसार विहिरी, नदीपात्रात श्रींचे विसर्जन केले जाते. मात्र, अलीकडच्या काळात याविषयी बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींनाच मागणी असते. त्यामुळे या मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करायचे असेल तर घरच्या घरी पाण्यात मूर्तीचे विसर्जन करून त्यात खाण्याचा सोडा मिसळला तर मूर्ती लवकर विरघळते आणि याच पाण्याचा खत म्हणूनही वापर करता येतो, असे मूर्तीकारांनी सांगितले.
४८ तासांत विरघळते मूर्ती
घरी बसविलेल्या गणेश मूर्तींचा आकार लक्षात घेतला तर घरीच विसर्जित केलेल्या पाण्यात खाण्याचा सोडा प्रमाणात मिसळला तर साधारणत: ४८ तासांत ही मूर्ती पूर्णत: विरघळते. त्यामुळे नागरिकांनी गणेश मूर्तींचे घरी विसर्जन करण्यासाठी पाण्यात खाण्याचा सोडा वापरणे आवश्यक आहे.
नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर
पीओपीच्या मूर्तींचे घरच्या घरी पाण्यात विसर्जन केल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही. शिवाय प्रक्रियाही सोपी आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर जमा झालेल्या पाण्याचा झाडांसाठी खत म्हणून वापर करता येणार असल्याने झाडांसाठीही ही प्रक्रिया पोषक ठरेल.
पीओपीच्या मूर्ती वापरल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही. नागरिक फक्त काळजी घेणे गरजेचे आहे. शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा पीओपी मूर्तींना मागणी असते. शिवाय दरही कमी असतात. या मूर्तींचे घरीच विसर्जन करण्यासाठी खाण्याचा सोडा वापरणे आवश्यक आहे.
- विशाल रिठे, मूर्तिकार