अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीस कारावास; परभणी न्यायालयाचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 06:33 PM2018-01-10T18:33:34+5:302018-01-10T18:34:21+5:30
अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा परभणीच्या न्यायालयाने आज सुनावली.
परभणी : अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा परभणीच्यान्यायालयाने आज सुनावली.
या संदर्भात सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीने ८ सप्टेंबर २०१३ रोजी या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला होता. माझ्यासोबत प्रेम कर, मैत्री कर, जर तू बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन व तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवील, असे आरोपी लक्ष्मण प्रभाकर पौळ याने पीडित मुलीस म्हणाला. मुलीने हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर आरोपीस समजावूनही सांगण्यात आले. मात्र त्यानंतर ८ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपी पौळ याने मुलीच्या घरात घुसून तुझ्या वडिलांना जिवे मारेन, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर पीडित मुलीने सेलू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरुन आरोपी लक्ष्मण पौळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तपासी अंमलदार बी.आर. जाधव यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
येथील विशेष सत्र न्यायालयात हा खटला चालविण्यात आला. सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी एकूण चार साक्षीदारांच्या जबानी नोंदविल्या. पीडित मुलगी ही घटनेच्या वेळी १८ वर्षांखालील होती. तसेच आरोपीने केलेले कृत्य हे गुन्ह्यास पात्र असल्याचा युक्तीवाद गाजरे यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्या.एस.जी. ठुबे यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्याचे कलम १२ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा अािण दीड हजार रुपये दंड सुनावला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मिलिंद गाजरे यांनी काम पाहिले.