घरगुती भांडणातून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून

By राजन मगरुळकर | Published: September 16, 2023 07:06 PM2023-09-16T19:06:50+5:302023-09-16T19:08:49+5:30

कालव्यातील मृतदेह प्रकरणात १२ तासात लावला पोलीसांनी छडा

In a domestic dispute, the husband killed the second wife with the help of the first wife | घरगुती भांडणातून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून

घरगुती भांडणातून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने केला दुसऱ्या पत्नीचा खून

googlenewsNext

परभणी : घरगुती कारणावरून झालेल्या भांडणातून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीला मारहाण केली. यात तिला कालव्यात येऊन पाण्यात बुडवून ठार मारले, असा धक्कादायक प्रकार नांदखेडा रोड भागातील कालव्यात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या प्रकरणात समोर आला आहे. यामध्ये परभणी पोलिसांनी घटनेतील आरोपी पती-पत्नीला अवघ्या १२ तासाच्या आत ताब्यात घेतले. यामध्ये दुसऱ्या पत्नीचा खून पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने केल्याचे उघड झाले.

नांदखेडा रोड भागात कालव्यामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. यामध्ये नानलपेठ ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद सुरुवातीला करण्यात आली. तपासाअंती महिलेची ओळख पटवून सदर महिलेचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाकडून या महिलेची ओळख पटवून आरोपी निष्पन्न करण्यासाठी तपास करण्यात आला.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार व सर्व अंमलदार यांनी मयत महिलेची माहिती घेताना समजले की, मयत महिलेचे नाव शिल्पा नामदेव दुधाटे (रा.नेहरूनगर, जिंतूर रोड) ही असून तिने नामदेव दिगंबर दुधाटे (रा.लिमला, ता.परभणी) याच्या सोबत मागील दोन वर्षापासून लग्न करून राहत होती. त्यावरून नामदेव दुधाटे याचा परभणीत शोध घेणे सुरू केले. नामदेव हा लिमला येथे असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सदरील ठिकाणी सापळा रचून त्याच्या घरात पाहणी केली. तेथे एक पुरुष व एक महिला आढळून आली. त्यांना ताब्यात घेत विचारले असता त्यांनी त्यांची नावे नामदेव दिगंबर दुधाटे (३०) व त्याची पहिली पत्नी स्वाती नामदेव दुधाटे (२४, रा.लिमला) असे सांगितले.

दोघांनी दिला कबूली जवाब
मयत महिला शिल्पा दुधाटे हिच्याबाबत विचारले असता नामदेव दुधाटे याने सांगितले की, मयत महिला शिल्पा हिच्यासोबत दोन वर्षांपूर्वी लग्न केले असून मी तिच्यासोबत नेहरू नगर येथे राहत होतो. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून त्यांच्याच भांडण झाले. यातून पहिली पत्नी स्वाती दूधाटे व मी यांनी तिला मारहाण केली. यानंतर नांदखेडा येथील कालव्यात नेऊन पाण्यात बुडवून ठार मारल्याचे सांगितले. त्यावरून दोघांनाही ताब्यात घेऊन नानलपेठ ठाण्यात हजर करण्यात आले.

यांनी उलगडला गुन्हा
ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, बाळासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, आशा सावंत, जयश्री आव्हाड, दिलावर खान, निलेश परसोडे, शेख रफीयोद्दिन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे, गणेश पवार, विजय मुरकुटे, रंगनाथ देवकर, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली.

Web Title: In a domestic dispute, the husband killed the second wife with the help of the first wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.