मुक्कामी बस पहाटे पुराच्या पाण्यात वाहत गेली; वेळीच बाहेर पडल्याने चालक-वाहक बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:53 PM2024-09-02T12:53:20+5:302024-09-02T12:54:41+5:30
सध्या पुरात वाहून जाणारी बस एका खांबाला अडकली आहे; मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथील घटना
मानवत : तालुक्यातील वझुर बुद्रुक येथे मुक्कामी थांबलेली एसटी महामंडळाची बस पुराच्या पाण्यात वाहत गेल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. प्रसंगावधान दाखवत चालक आणि वाहकांनी बसमधून बाहेर उड्या मारल्याने पुढील अनर्थ टळल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
रात्र मुक्कामी थांबलेली बस पहाटे पुराच्या पाण्यात वाहत गेली; मानवत तालुक्यातील वझुर (बु.) येथील घटना #parabhaninews#MarathwadaRainpic.twitter.com/wV8PIm0O1a
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 2, 2024
मानवत तालुक्यातील वझुर बुद्रुक या गावात एसटी महामंडळाची बस गावातील मंदिरासमोर मोकळ्या जागेत थांबली होती. रात्रभर झालेल्या पावसामुळे गावातील नदी, नाल्यांना पूर आला. पहाटे पुराचे पाणी थेट गावात आल्याने पाण्याच्या प्रवाहात मुक्कामी थांबलेली बस वाहून गेली. दरम्यान, बसमध्ये झोपलेल्या चालक आणि वाहकास पुराचा वेढा बसून बसमध्ये पाणी शिरल्याचे लक्षात आले. चालकाने तत्काळ बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस सुरू झाली नाही. यामुळे प्रसंगावधान राखत दोघांनी बसमधून वेळीच बाहेर उडी घेतल्याने प्राण वाचल्याचे गावकऱ्यांना सांगितले. सद्यस्थितीत ही बस पुराच्या पाण्यात एका खांबाला अडकून पडली आहे.